बस मध्ये सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांना अटक

जळगाव : बस मध्ये सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिलांना अमळनेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. धरणगाव ते चोपडा बस प्रवासा दरम्यान बसलेल्या चोरट्या महिलांनी सह प्रवासी महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने चोरी केले होते. या घटने प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमरावती जिल्ह्याच्या वरुड येथील बाजारातून या चोरट्या महिलांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सलग आठ ते दहा दिवस या चोरट्या महिलांच्या मागावर पोलीस पथक होते. 

धरणगाव तालुक्यातील तक्रारदार महिला त्यांच्या  नातेवाईकाच्या लग्नासाठी धरणगाव येथून शिंदखेडा तालुक्यात जाण्यासाठी प्रवास करत होत्या. धरणगाव ते चोपडा दरम्यान चोरट्या महिलांनी सहप्रवासी तक्रारदार महिलेच्या पर्स मधील दागिन्यांची शिताफीने चोरी केली होती. त्यानंतर सर्व चोरट्या महिला चोपडा नाका येथे उतरुन पसार झाल्या होत्या. त्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. 

तपासाच्या अनुषंगाने अमळनेर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी करत आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी चोरट्या महिला पोलीस पोहोचण्यापूर्वीच पसार होत असत. चोर पोलिसांचा हा खेळ काही दिवस सुरु होता. अखेर तांत्रिक विश्लेषणासह गुप्त बातमीदाराच्या मदतीने चोरट्या महिलांना अमरावती जिल्ह्याच्या वरुड येथील बाजारातून शिताफीने ताब्यात घेण्यात पोलीस पथकाला यश आले. चोरट्या महिला त्यांचे वास्तव्याचे ठिकाण जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा, मध्य प्रदेश राज्यात वेळोवेळी बदलत होत्या. गंगा चैना हातगळे आणि गंगा सुभाष नाडे (दोन्ही रा. नेताजी नगर, यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून 7 लाख 70 हजार रुपये किमतीचा आजच्या बाजार भावानुसार मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

अमळनेर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक नामदेव बोरकर, पोहेकॉ मिलींद सोनार, पोकॉ विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश गोरे, उज्वलकुमार म्हस्के, अमोल पाटील, गणेश पाटील तसेच महिला होमगार्ड निलीमा पाटील यांच्यासह नेत्रम कार्यालय जळगाव येथील पो कॉ पंकज खडसे, कुंदनसिंग बयस, गौरव पाटील, मिलींद जाधव यांनी तपास कामी सहभाग घेतला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here