येरवडा तात्पुरत्या कारागृहातून दोघा कैद्यांचे पलायन

पुणे : जबरी चोरी व खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघा कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांनी आज पहाटे येरवडा तात्पुरत्या कारागृहातून पलायन केले आहे. अनिल विठ्ठल वेताळ (२१), गणेशनगर, भीमा कोरेगाव, ता. शिरुर आणि विशाल रामधन खरात, समर्थ सोसायटी, निगडी अशी पलायन केलेल्या दोघा कैद्यांची नावे आहेत.

अनिल वेताळ याला मारहाण करुन लुट केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. विशाल खरात याला खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोघांची रवानगी येरवडा तात्पुरत्या कारागृहात करण्यात आली होती. कारागृहात ठेवतांना केलेल्या वैद्यकीय तपासणीत दोघे कोरोना पॉझीटीव्ह असल्याचे समोर आले होते.

कारागृहातील इमारत क्रमांक ४ मधील पहिल्या माळ्यावरील खोलीत त्यांना ठेवण्यात आले होते. आज पहाटे या दोघांनी सर्वांची नजर चुकवून पळून जाण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंत अनेक कच्चे कैदी या कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. पळून गेलेल्या काही जणांचा पोलिसांनी शोध घेवून त्यांना पुन्हा अटक देखील केली आहे. पळून गेलेले दोघे कैदी कोरोना पॉझीटीव्ह असल्यामुळे कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here