मुंबई : जागतिक बाजारातील पडसाद कमॉडिटी बाजारात आज दिसून आले. शुक्रवारी सकाळी सोने व चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचा भाव 51 हजार रुपयांच्या जवळपास आहे. चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये गुरुवारी सोने व चांदीच्या दरात वाढ झाली होती. आज सकाळपासून दोन्ही धातूंमध्ये विक्रीचा सपाटा सुरु झाला आहे. सध्या सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 424 रुपयांनी कमी झाला आहे. तो आता 51150 रुपयांच्या जवळपास आहे.जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याची मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संकटाची तीव्रते सोबत आर्थिक समस्येमुळे सोन्याला सुगीचे दिवस आले आहेत. शुक्रवारी स्पॉट गोल्डचा भाव प्रती औंस 0.3 टक्क्यांनी कमी झाला. तो 1947.41 डॉलर प्रती औंस एवढा झाला आहे. चांदीचा भाव 0.3 टक्क्यांनी कमी झाला असून तो 26.84 डॉलर प्रती औंस आहे.
जगात कोरोनाचे रुग्ण वाढत असून देखील कमॉडिटीजचे दर सुस्थितीत आहेत. पुरवठ्यासंबंधीच्या अडचणी असून देखील जगभरातील अर्थव्यवस्था सुरु झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार जोखीम घेण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वेगवान आर्थिक सुधारणेची शक्यता कमी असल्याचे दिसत आहे. अमेरिका-चीनदरम्यान तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बुधवारी, स्पॉट गोल्डच्या किमतीत 0.81 टक्क्यांनी वाढून ते 1946.7 डॉलर प्रति टनांवर कायम राहिले.