ओएलएक्सच्या माध्यमातून १ लाख ८० हजारांचा गंडा

औरंगाबाद : एटीएम सेंटरसाठी ओएलक्सवर जाहिरात करणे एकाला महागात पडले. सायबर गुन्हेगारांनी दुकान भाड्याने घेण्याचे सांगत एका दुकानदाराला १ लाख ८० हजार ८२३ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या फसवणूकप्रकरणी सिडको स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार प्रशांत मधुकर अकोलकर यांना त्यांचे दुकान एटीएम सेंटर साठी भाड्याने द्यायचे होते. त्यासाठी त्यांनी ओएलक्स या संकेतस्थळावर जाहिरात अपलोड केली होती.
जाहिरातीत नमुद करण्यात आलेल्या नंबरवर आरोपी विवेक पांडे (रा. बडोदा), आनंद वर्मा व दोघा महिलांनी प्रशांत अकोलकर यांच्याशी संपर्क साधत दुकान भाड्याने घेण्याची तयारी दाखवली. दुकान भाडे आणि डिपॉजीट देण्याची तयारी दाखवत विश्वास संपादन केला.

आरोपींनी दुकानाच्या मालकी हक्काची कागदपत्रे ऑनलाईन मागवून घेण्यात यश मिळवले. करारनामा व प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली तक्रारदारास ऑनलाईन १ लाख ८० हजार ८२३ रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. ऑनलाईन रक्कम जमा होताच आरोपींनी त्यांचे मोबाईल बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रशांत अकोलकर यांनी सिडको पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक गिरी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here