जळगाव : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीचा दोरीने गळा आवळून खून करणा-या पतीने नंतर झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात उघडकीस आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथे 2 जून रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. आत्महत्येनंतर मरण पावलेल्या पतीच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय सुकदेव चव्हाणके (45) आणि वर्षा चव्हाणके (40) अशी मृत पती पत्नीची नावे आहेत. विजयचे काही वर्षापूर्वी झालेल्या अपघातामुळे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यातून त्याचे पत्नीसोबत कौटुंबिक कारणातून तसेच चारित्र्याच्या संशयातून वाद होण्याचे प्रमाण वाढले होते. पत्नीचा खून करुन स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करणार असल्याचा निरोप त्याने भाऊ सुकदेव यास आत्महत्येपूर्वी दिला होता.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलिस उपनिरीक्षक शेवाळे, राहुल प्रदीप राजपूत, हवालदार ओंकार सुतार आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई आणि तपास केला.







