नवी दिल्ली : अनेक तरुणींचे लैंगिक शोषण करणाऱ्या तसेच नऊ मुलींना फूस लावून पळवून नेणारा कुख्यात लव्हगुरु यास दिल्ली पोलिसांच्या क्राइमब्रँच व इंटरस्टेट सेल कडून अटक करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशच्या सोलन जिल्ह्यातील बद्दी येथून या लव्ह गुरुला अटक करण्यात आली. पेशाने शिक्षक असलेल्या या तथाकथित लव्हगुरुचे मुळ नाव धवल त्रिवेदी आहे. त्याच्या कारवाया लक्षात घेता सीबीआयने त्याच्या नावे पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
सोशल मीडियावर लव्हगुरु या नावाने कुविख्यात धवल त्रिवेदी यास लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरार झाला होता. धवल त्रिवेदी याने कित्येक महिला व अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केले. ९ महिलांना त्याने आपल्या प्रेमजाळ्यात ओढून पळवले होते. यामधे एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे.
सन २०१८ पासून हा लव्हगुरु फरार होता. मुंबई सीबीआयने त्याची माहिती देणा-यास पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहिर केले होते. कुख्यात गुन्हेगार लव्ह गुरु याने पोलिसांना माहिती देतांना म्हटले की आपल्याला एक पुस्तक लिहायचे असून त्या पुस्तकाचे नाव “१० परफेक्ट वुमन इन माय लाइफ” असे ठेवायचे आहे. गुजरात राज्याच्या राजकोट पोलीस स्टेशनला त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून त्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
पॅरोलवर बाहेर येताच तो फरार झाला होता. दिल्ली पोलिसांना हिमाचल प्रदेशातील बद्दी परिसरात त्याचे लोकेशन मिळताच त्याला पकडण्यात आले. इन्स्पेक्टर नीरज चौधरी व एससीपी संदीप लांबा यांच्या पथकाने त्याला पकडण्यात यश मिळवले.