मुंबई : कोरोनाच्या सावटाखाली मंत्रालययातील वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थितीची अट रद्द करा नाही तर काम बंद आंदोलनाचा इशारा राजपत्रित अधिकारी महासंघाकडून देण्यात आला आहे.
मंत्री, कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. मंत्रालयात येणाºया अभ्यागतांची फक्त थर्मामीटर गनने तपासणी केली जात आहे. कोरोनाबाधित नसल्याचे प्रमाणपत्र असेल तरच आत प्रवेश देण्याची मागणी अधिकारी व कर्मचारी करत आहेत. मंत्र्यांच्या दालनात येणारे लोक कोणतेही सोशल डिस्टन्स पाळत नाही. आतापर्यंत पाच मंत्र्यांची कार्यालये कोरोनामुळे बंद झाली आहेत.
त्यातच शासकीय अधिका-यांची १०० टक्के उपस्थिती सामान्य प्रशासन विभागाकडून आवश्यक करण्यात आली आहे. वैद्यकीय सुविधांचा अभाव, वाहतुकीची अपुरी साधने, अशा परिस्थितीत १०० टक्के उपस्थितीचा निर्णय योग्य नसल्याचे अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी म्हटले आहे.
१०० टक्के उपस्थितीच्या अटीचा निषेध करण्यासाठी राज्यातील सर्व शासकीय अधिकारी २१ सप्टेंबरला निषेध दिन पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दिवशी प्रत्येक कार्यालयात निषेध बैठक घेतली जाईल. तरी देखील सरकारने अट कायम ठेवली तर काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.