जळगाव : अपहरण झालेल्या पाच वर्षाच्या बालिकेचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने शोध लावला असून तिला सुखरुपपणे तिच्या पालकांच्या हवाली करण्यात आले. या घटने प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. गोरेलाल भगवानसींग कछवे उर्फ भिलाला रा. अजदरा मध्य प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या अपहरणकर्त्याचे नाव आहे.
दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी दोन ते तिन वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरातील बस स्थानक परिसरातून पाच वर्ष वयाच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. अज्ञात अपहरणकर्त्याविरुद्ध तिच्या आईने भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. तांत्रीक आणि खबरीच्या माध्यमातून तपास सुरु असतांना हा गुन्हा गोरेलाल भगवानसिंग कछवे याने केल्याचे निष्पन्न झाले. त्याला बोदवड नजीक असलेल्या उजनी या देवस्थान परिसरातून पिडीत मुलीसह ताब्यात घेण्यात आले. अटकेतील गोरेलाल कछवे याच्याविरुद्ध यापुर्वी मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील चैनपूर पोलिस स्टेशनला देखील अशाच स्वरुपाचा गुन्हा नोंद आहे.
भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील, पोलिस उप निरीक्षक मंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, पो हे कॉ कांतीलाल केदारे, पो हे कॉ रवींद्र भावसार, पो कॉ योगेश माळी, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, अमर अढाळे, जावेद शहा, हर्षल महाजन, जिवन कापडे, योगेश महाजन, सचीन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, मोहसीन शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक रविंद्र नरवाडे, पो हे कॉ उमाकांत पाटील, पो हे कॉ अक्रम शेख, पो हे कॉ गोपाल गव्हाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, पो कॉ प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, राहुल रगडे, उदय कापडणे, रविंद्र चौधरी, किशोर पाटील, नेत्रम कॅमेरा विभागाचे पो कॉ मुबारक देशमुख, पंकज राठोड, प्रणय पवार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोहेकॉ रमण सुरळकर करत आहेत.






