मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून केवळ पन्नास टक्के प्रवासी घेऊन धावणारी लालपरी उद्यापासून पूर्ण प्रवासी क्षमतेने धावणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने परिपत्रक काढून याची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना देखील महामंडळाकडून दिल्या आहे
गुजरात व कर्नाटक राज्यात अगोदरच पूर्ण क्षमतेने एसटी प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पन्नास टक्के प्रवासी क्षमतेने सुरू असलेल्या सेवेमुळे महामंडळ नुकसानीत जात आहे. दररोजचा खर्च निघणे कठीण झाले आहे. गेल्या दोन महिन्यापासून कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे आगामी काळात आर्थिक बाजू जास्त खराब होऊ नये यासाठी हा निर्णय झाला आहे.
मात्र बसमधून प्रवास करताना प्रवाशांना मास्क व सॅनिटायझर लावणे आवश्यक राहणार आहे. वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतुक केल्यानंतरच वापरण्याच्या सूचना महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत.