बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मोरगाव नीरा रस्त्यावर २४ जुन रोजी सिगारेटची वाहतूक करणा-या ट्रकवर दरोडा टाकण्यात आला होता. ४.५० कोटी रुपयांचा कंटेनर लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील टोळीविरोधात मोका अतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपींनी महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील दरोडे टाकले आहेत.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मोरगाव – निरा रस्त्याने दि २४ जून २०२० रोजी आयशर ट्रक (एन एल ०१ एल ४३३९ ) जात होता. रांजणगाव येथून निघालेला हा ट्रक आयटीसी कंपनीची फिल्टर सिगारेट बॉक्स ४,६१,८८,८२० रुपयांचा माल घेऊन कर्नाटक हुबळी येथे जात होता. दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास १३ अज्ञात व्यक्तींनी या ट्रकवर दरोडा घातला होता.
या घटनेची माहिती मिळताच पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक गुंड व त्यांच्या पथकाने या दरोडा प्रकरणी गुन्हयातील कल्याणसिंग सदुलसिंग चौहान (४४) रा ओढ ता सोनकच जि देवास, ओमप्रकाश कृष्णा झाला (३८) भैरवखेडी ता.टोकखुर्द जि. देवास, दिनेश वासुदेव झाला (५०) टोककला ता. टोंकखुर्द जि. देवास, सुशिल राजेंद्र झाला (३७) टोककला ता. टोंकखुर्द जि. देवास, मनोज उर्फ गंगाराम राजाराम सिसोदिया (४२) भैरवखेडी ता टोकखुर्द जि देवास, सतिश अंतरसिह झांझा (४०) ओढ ता. सोनकच जि. देवास, मनोज केसरसिंग गुडेन (४०) ओढ ता. सोनकच जि. देवास या आरोपींना अटक केली आहे. या गुन्हयातील ३,८९,३४,७९२( तीन कोटी एकोण नव्वद लाख, चौतीस हजार सातशे ब्यान्नव) रुपयांचा मुद्देमाल, दोन ट्रक आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींवर यापुर्वी महाराष्ट्र राज्यातील यवत, शिक्रापूर ,शनि शिंगणापुर पोलीस स्टेशच्या हद्दीत तसेच कर्नाटक, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल , ओरिसा, हरियाणा आदी राज्यात आरोपींवर औषध ,सिगारेटच्या ट्रकवर दरोड्याचे गुन्हे दाखल असल्याचे समजते.
आरोपींनी विविध राज्यात दरोड्याचे गुन्हे केल्याने त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, गणेश कवितके, विठठल कदम, भाउसाहेब मारकड, अमोल भुजबळ यांनी या तपासकामी परिश्रम घेतले. प्रभारी अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते यांनी तपास पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.