जळगाव दि. २४ (प्रतिनिधी) – “माझ्या या कर्मभूमीने मला भरभरून दिले, त्यात कुणीही उपाशी राहू नये यासाठी मी व्यवस्था मार्गी लावणार आहे,” असा विचार श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी आयुष्यभर जपला. हा त्यांच्या मूल्यांचा वारसा अशोक जैन, अनिल जैन, अजित जैन व अतुल जैन यांना लाभला. घरातील संस्कारही या दातृत्वाला पोषक ठरले. गवंडी, सुतार काम करणाऱ्यांना भाजीपोळी देणाऱ्या आई कांताबाईंच्या आतिथ्यशीलतेतूनच पुढच्या पिढीला माणुसकीचा वारसा मिळाला आणि येथून सुरू झाला सामाजिक बांधिलकीचा प्रवास. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी भवरलालजी जैन यांचा १० वा स्मृतिदिवस आहे.

गेले सहा वर्ष सुरू असलेली जैन इरिगेशनची “स्नेहाची शिदोरी” हा उपक्रम महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरतो आहे. कोरोना काळात या उपक्रमाला व्यापक स्वरूप मिळाले आणि लाखो गरजुंना दिलासा मिळाला. २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत एकूण ३१,३८,७७९ पाकिटांचे वितरण या उपक्रमातून झाले आहे.
कोरोना काळात या उपक्रमाने केवळ अन्नधान्याची पिशवी किंवा शिधा वाटण्यापुरते मर्यादित न राहता, २ वेळेचे भोजन मदतरूप आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी १२ डिसेंबर २०२० रोजी भवरलालजींच्या जन्मदिनी “स्नेहाची शिदोरी” कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याची घोषणा केली. या स्नेहाच्या शिदोरीचा लाभ अनेक जण घेत आहेत. जळगाव शहरात कुणीही उपाशी राहू नये हा भवरलालजी जैन यांचा ध्यास होता. त्याची पूर्तता जैन परिवाराने अत्यंत आत्मियतेने केलेली दिसते. सप्टेंबर २०२५ पर्यंत कांताई सभागृहात दररोज १४०० स्नेहाची शिदोरी दिली जात होती. सकाळी चार पोळ्या, भाजी, चटणी तर संध्याकाळी पौष्टिक खिचडी अशी शिदोरी गरजूंच्या हातात पोहोचते. सणासुदीला गोडधोड भोजनही दिले जाते. सप्टेंबर २०२५ नतर मात्र ही संख्या दररोज ७०० या प्रमाणे झाली असून २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत जैन इरिगेशनने एकूण ३१ लाख ३८ हजार ७७९ पाकिटे वितरित केलेली आहे.
पहाटे चार वाजता जैन हिल्स येथील ‘राजाभोज’ भोजनालयातून ही प्रक्रिया सुरू होते. पॅकिंग, चव, गुणवत्ता यावर अध्यक्ष अशोक जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांचे वैयक्तिक लक्ष असते. या उपक्रमाचा लाभ स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, वैद्यकीय कार्यासाठी आलेले रुग्ण व नातेवाईक, बंदोबस्तातील पोलीस, मुक्कामाला आलेले एसटी चालक-वाहक अशा अनेकांना होत आहे.
समाजाकडून आपण भरभरून घेतो, तर समाजासाठी कृतज्ञतेने काहीतरी परत दिले पाहिजे या भावनेतून सुरू झालेली “स्नेहाची शिदोरी” आज सामाजिक जीवनात माणुसकीचा आधारवड अशी ओळख निर्माण करणारी ठरली आहे. – अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. जळगाव.





