अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज

On: March 9, 2026 10:32 PM

जळगाव, दि.9 (प्रतिनिधी) : गांधी रिसर्च फाउंडेशन आणि एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पीस बिल्डर्स फोरम इंडिया’ ही राष्ट्रीय बैठक जैन हिल्स येथे 8 मार्चपासून सुरु झाली. या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी देश-विदेशातून आलेल्या शांतिदूतांनी अहिंसक समाज निर्मितीसाठी व्यापक प्रयत्नांची गरज व्यक्त केली. 

बैठकीत बोलताना एकता परिषदेचे पी. व्ही. राजगोपाल यांनी आजच्या युगात खेळणी उद्योग, सोशल मीडिया आणि चित्रपट सृष्टी कशा प्रकारे तरुणांमध्ये हिंसेचा रोमांच निर्माण करत आहेत, याकडे लक्ष वेधले. राजगोपाल यांनी शांततापूर्ण समाजासाठी अहिंसक शासन व्यवस्था, अर्थव्यवस्था, शिक्षण आणि सामाजिक आंदोलने या चतुःसूत्रीचा आग्रह धरला. यावेळी गुजरातचे सामाजिक कार्यकर्ते संजयभाई यांनी २००२ च्या दंगलींनंतर संवाद आणि विश्वासाच्या जोरावर केलेल्या पुनर्वसनाचा अनुभव सांगितला. ज्येष्ठ पत्रकार रजनी बक्षी यांनी मुंबईतील मोहल्ला समितीच्या मॉडेलचा दाखला देत सामुदायिक स्तरावर विश्वास निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. तर मणिपूरचे डॉ. देबेन यांनी राजकारण आणि शिक्षण व्यवस्था संविधानातील न्याय आणि समतेच्या तत्त्वांवर आधारित असल्यास हिंसेची शक्यता कमी होईल, असे नमूद केले. बैठकीत अबीदा, मृत्युंजय, अनंत गिरी, डॉ. कुप्पु स्वामी यांच्यासह इतरांनीही आपले विचार मांडले. 

कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय कार्यकर्त्या ललिता रामदास यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे महिलांच्या भूमिकेवर भर दिला, तर जिल कॅर-हॅरिस यांनी वैयक्तिक बदलासोबतच संरचनात्मक बदलांसाठी महिलांनी नेतृत्व करण्याचे आवाहन केले.  बैठकीत प्रशासकीय संवेदनशीलता, शाळांमधील पीस क्लब आणि शांती सेना यांसारख्या विषयांवरही सखोल चर्चा करण्यात आली. बैठकीत देश-वेदशातून आलेले ५० शांतीदूत सहभागी झाले आहे. ८ मार्च रोजी सुरू झालेला हा फोरम १० आणि ११ मार्च रोजीही सुरू राहणार असून, ११ मार्चला याचा समारोप होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment