महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

On: April 30, 2026 10:12 PM

जळगाव, दि. ३० (प्रतिनिधी) – “महात्मा गांधीजींचे विचार कालही प्रासंगिक होते, आजही आहेत आणि येणाऱ्या काळात दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरणार आहेत, महात्मा गांधी हे लाईट हाऊसच आहेत.” असे महत्त्वपूर्ण विचार डॉ. प्रशांत बोकारे यांनी आजच्या गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पदवी प्रदान समारंभात दीक्षांत भाषणात व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत एस.बोकारे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, गीता धर्मपाल हे मान्यवर उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पदवी अभ्यासक्रमासाठी ९ राज्यांतील १६ म्हणजे ६ विद्यार्थीनी व १० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यातील रूपक दास, राखी कुमारी, सुशील, रजत यांनी अनुभव व्यक्त केले. यावेळी डॉक्युमेंटरी देखील प्रदर्शीत केली होती.  यानंतर गीता धर्मपाल यांनीदेखील विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण केले. 

आपल्या भाषणात डॉ. बोकारे म्हणाले की, आज ‘उपयोगी’ विषयांपुरती मर्यादित शिक्षण ही एक प्रकारची डिक्टेटरशिप तयार होत असल्याचे सांगून त्यांनी गांधी विचारांच्या प्रासंगिकतेवर जोर दिला. “गांधी विचार वाचायचे असतील तर विचारले जाईल, ‘यातून कारखाना चालेल का? इंटरनेट चालेल का? मार्केटिंग होईल का?’ असा प्रश्न. स्वातंत्र्याचा अर्थ फक्त इंग्रजांचा निघून जाणे नव्हे, तर विचारस्वातंत्र्य आहे,” असे ते म्हणाले. तंत्रज्ञानाच्या नावाखालील ‘ज्ञानतंत्रशाही’पासून मुक्ती मिळवावी, अन्यथा खरी स्वातंत्र्य फसवे ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. लंडनच्या राऊंड टेबल कॉन्फरन्सवेळी मँचेस्टरच्या इंडस्ट्रियलिस्टांनी गांधींना विचारले, “चरखा चालवून आमचा कपडा बाजार कसा वाचवणार?” गांधींनी उत्तर दिले, “माझ्या देशाला फाईन कपड्यांची गरज नाही, कपडा पहाण्याची गरज आहे.” डॉ. बोकारे म्हणाले, चरख्याने ग्रामीण महिलांना रोज ६ ते ८ आण्यांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले, जे आर्थिक आत्मनिर्भरतेचे प्रतीक होते. आजही ग्रामोद्योगातून ही तत्त्वे लागू करता येतील.

एकल चळवळीतर्फे ५५० ग्रामसभांपर्यंत पोहोचून बायोडायवर्सिटी अॅक्ट आणि फॉरेस्ट राइट अॅक्टबाबत ग्रामस्थांना शिकवले जात असल्याचे डॉ. बोकारे यांनी सांगितले. पुण्याच्या गोखले संस्थेतील ३०० वर्षे जुना वटवृक्षाखाली जेवताना त्यांना गांधी-गोखले यांची भेट जाणवली. “वर्धा येथील गांधी आश्रमाशी माझा निकट संबंध आहे,” असे सांगत त्यांनी ग्रामीण विकासासाठी प्रेरणा घेतली. “गांधी हे लाईटहाऊस आहेत, त्यांना कस्टमाईज करा. त्यांचे विचार आजही, उद्या आणि ५० वर्षांनंतरही अधिक प्रासंगिक राहतील,” असे प्रतिपादन डॉ. बोकारे यांनी केले. ग्रामीण भागात नशामुक्ती, ग्रामशिक्षण यांसारख्या टूल्सचा उपयोग करून गांधी तत्त्वे राबवावीत, असे आवाहन त्यांनी केलं.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी शिक्षणाची तुलना दगड कोरण्याच्या प्रक्रियेशी करून सांगितले आहे की, विद्यालय हे केवळ ज्ञान देणारे ठिकाण नसून व्यक्तिमत्त्व घडवणारे “तक्षशिला” आहे, जिथे गांधी विचारांच्या छिन्नी-हातोड्याने विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न होतो. हीच संकल्पना गांधीतीर्थचे निर्माते श्रद्धेय भवरलालजी जैन यांची हे तीर्थ निर्माण करण्यामागे होते. आजच्या वाढत्या हिंसक आणि अस्थिर जगात गांधी विचारांची उपयुक्तता कमी होत असल्यासारखी वाटत असली तरी विद्यार्थ्यांनी विचार आणि कृती यांचा समतोल राखून जगाला अधिक चांगले बनवण्याची जबाबदारी घ्यावी, असा संदेश दिला आहे. “कर्म बिना विचार निरर्थक, विचार बिना कर्म निष्फळ” असल्याने सतत शिकत राहणे, आत्मविश्वास वाढवणे आणि गुणांपेक्षा (grades) स्वतःच्या विकासाला महत्त्व देणे गरजेचे आहे. तसेच “नालंदा”सारख्या परंपरेप्रमाणे ज्ञान कधीही पूर्ण नसते, त्यामुळे आयुष्यभर शिकण्याची वृत्ती ठेवावी आणि समृद्धीची स्वतःची व्याख्या निर्माण करावी असे ते विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी तर आभारप्रदर्शन दीपक मिश्रा यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment