जळगाव : सागर आणि सायली (दोन्ही नावे काल्पनिक) हे पती पत्नी होते. दोघांचा संसार सुखाने सुरु होता. धुळे येथील माहेरवाशीन असलेली सायली लग्नानंतर पतीसोबत जळगाव येथे सासरी आली.
सायलीचा पती टेलरींग काम करत होता. जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात शिलाई मशीन लावून आलेल्या ग्राहकांचे शिलाईचे किरकोळ कामे तो करत असे. शिलाईच्या किरकोळ कामातून त्याला चांगले उत्पन्न मिळत होते. शिलाई कामातून मिळणा-या उत्पन्नावर त्याचा संसार सुखाने सुरु होता.
एकंदरीत सर्व काही सुरळीत सुरु असतांना अचानक मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाले. सर्व दुनीया घरात बसली. दुकानदारी ठप्प झाली. रस्त्यावर शुकशुकाट झाला. उडणारी पाखरे देखील आपल्या घरट्यात जावून जगाची अवस्था बघू लागली. त्या लॉक डाऊनमुळे सागरच्या शिलाई मशीनचे चाक देखील थांबले. अर्थातच त्याचा आर्थिक स्त्रोत बंद झाला. हातावर पोट असणारा सागर डोक्याला हात लावून बसला. आता काय करावे असा विचार तो करु लागला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला केवळ “इक्कीस दिन” लॉकडाऊनची घोषणा केली. जावू द्या – काढून घेवू “इक्कीस दिन” असा विचार सागरने मनाशी विचार केला. हळूहळू कोरोना विषाणूचा फैलाव वाढत गेला. तो आटोक्यात येण्याची चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा “इक्कीस दिन” चा प्रस्ताव सतरंजीप्रमाणे गुंडाळून ठेवावा लागला. परिस्थितीच तशी होती.
शिलाई मशीनचे चाक व त्यातून फिरणारे आर्थिक गणीताचे चाक थांबल्यामुळे हतबल झालेला सागर आता काय करावे असा विचार करु लागला. आपल्या संसार वेली वर पत्नीसह दोन मुली व एक मुलगा अशा चार फांद्या वाढल्याचे त्याला दिसत होते. जेव्हा शिलाई मशीनचे चाक जोरात फिरत होते त्यावेळी सागर त्याचे सट्टा, पत्ता व दारु पिण्याचे शोक पुर्ण करत होता. आलेल्या पैशातून आपले शोक पुर्ण करण्यात त्याला काही वाटत नव्हते. मात्र आता उलाढाल थांबली होती. सर्वत्र लॉक डाऊन सुरु असले तरी भाजीपाला विक्रीला मनाई नव्हती. अत्यावश्यक सेवेत मोडला जाणारा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारा त्याचा एक मित्र होता. त्याचे नाव रमेश काकडे असे होते. तो पिंप्राळा हुडको परिसरात रहात होता.
लॉकडाऊन काळात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्याचा सल्ला रमेश काकडे याने सागर यास दिला. मात्र ज्या भागात सागर रहात होता त्या भागात भाजीपाला विक्री करण्यास त्याला लज्जा अर्थात संकोच वाटत होता. आपण टेलर काम करणारे व आता भाजीपाला कसा विकायचा? व तो देखील आपण रहात असलेल्या परिसरात. लोक काय म्हणतील असा विचार तो करु लागला. त्यावर उपाय म्हणून रमेश काकडे याने सागर यास तो रहात असलेल्या पिंप्राळा हुडको परिसरात रहायला येण्यास सुचवले.
रमेश काकडे हा एकटाच रहात होता. त्यातल्या त्यात तो फाजील होता. स्त्री देहावर त्याची नजर चांगली नव्हती. एवढे सर्व माहीत असतांना देखील सागर त्याच्या नादाला लागून तो रहात असलेल्या पिंप्राळा हुडको परिसरात भाड्याच्या घरात राहण्यास आला. या परिसरात आपल्याला कुणी ओळखत नाही व भाजीपाला विक्री करतांना आपल्याला लाज अथवा संकोच बाळगण्याचे कारण नाही असा त्यामागचा हेतू होता.
सागरची पत्नी सायली हिला पिंप्राळा हुडको भागात रहायला जाण्याचा प्रस्ताव अजिबात आवडला नव्हता. परंतू तिचे म्हणणे ऐकून घेण्यास सागरची तयारी नव्हती. तो त्याचा फाजील दोस्त रमेश काकडे याच्या नादी लागला होता.
20 मे रोजी सागर व त्याची पत्नी सायली व मुले असे सर्व जण पिंप्राळा हुडको भागात राहण्यास आले. सायली दिसायला देखणी होती. तिचे तारुण्य लाजवाब होते. तिच्य देखण्या कटीबद्ध शरीरावर फाजील मित्र रमेश काकडे याची नजर जाताच तो घायाळ झाला. काहीही करुन तिला आपलेसे करण्याचे त्याने मनाशी ठरवले होते. त्यासाठी कच्चा दुवा असलेला तिचा पती सागर यास आमिष दाखवण्यास त्याने सुरुवात केली. सायलीचा पती आपल्या ताब्यात आला म्हणजे सायली आपल्या ताब्यात आली हे त्याचे गणीत होते. त्यात तो ब-याच प्रमाणात यशस्वी झाला. त्याने अगोदर सागरवर मोहीनी घातली. रमेशच्या आमिषाला व बोलण्याला सागर बळी पडला. रमेशकडून आपल्याला या लॉक डाऊन काळात आर्थिक मदत होईल असे सागरने ठरवले. त्यासाठी त्याने पत्नी सायलीचाच बळी देण्याचे ठरवले. सागर यास दारु, सट्टा, पत्ता याचे व्यसन होते. त्याचे व्यसन लबाड व कावेबाज रमेश काकडे याने हेरले होते.
5 जून रोजी दुपारी सागर त्याची पत्नी सायली जवळ आला. त्याने तिला म्हटले की तु किचन मधे कपडे बदलत जावू नको. तु माझा मित्र रमेश याच्या समोर कपडे बदलत जा. असे केल्यास आपल्याला व्यवसायात फायदा होईल. आपला पती आपल्याला मित्रासमोर कपडे बदलण्यास सांगत असल्याचे बघून सायलीला धक्काच बसला. ज्या पतीरुपी कवचाच्या बळावर आपण लग्न करुन आलो तो पतीच अर्थात ते कुंपनच आपल्याला मित्रासमोर कपडे बदलण्यास सांगत असल्याचे ऐकून ती हादरली. तिने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. तिचा नकार ऐकताच सागर चिडला. त्याने तिला धमकी दिली की तु जर माझ्या मित्रासमोर कपडे बदलले नाही तर मी आपल्या मुलांना ठार करेन व स्वत: देखील आत्महत्या करुन घेईन. मी अगोदरच या लॉकडाऊन मुळे वैतागला आहे.
अगदी नाईलाज झाल्यामुळे अंग चोरुन चोरुन तिने रमेश काकडे याच्यासमोर बाहेरच्या खोलीत कपडे बदलण्यास सुरुवात केली. तिची अंगकाठी बघून रमेश काकडे याची नियत फिरली. तो तिच्याकडे अतिशय वाईट नजरेने बघू लागला. त्यानंतर तिन दिवस असेच निघून गेले. या तिन दिवसांच्या कालावधीत रमेशने सागरला आमिष दाखवून सायलीसोबत शैय्यासोबत करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले.
8 जून रोजी रात्री आठ वाजता सायलीने घरातील सर्व सदस्यांची क्षुधाशांती केली. सर्वांचे जेवण आटोपल्यानंतर तिने भांडीकुंडी घासून आवरण्यास सुरुवात केली. मुलांना झोपवून ती देखील झोपण्याच्य तयारीत होती. त्याचवेळी सागर तिच्याजवळ आला. त्याने तिला म्हटले की आजची रात्र तू माझा मित्र रमेश सोबत घालव. तु त्याला शैय्यासोबत कर. आता हद्द झाल्याचे बघून सायली चिडली. हा प्रकार मी तुमच्या आईवडीलांना सांगेन असे ती म्हणू लागली. तिची धमकी ऐकून सागर चिडला. तु जर माझे ऐकले नाही तर मी आपल्या मुलांना मारुन टाकीन व स्वत: देखील आत्महत्या करुन घेईन अशी तो तिला धमकी देवू लागला. त्यानंतर तो तावातावने घरातून निघून गेला.
काही वेळाने सागर घरात आला. सोबत येतांना त्याने शितपेयाची बाटली घेवून आला. तु टेन्शन घेवू नको. हे शितपेय घे त्यामुळे तुझ्या मनावरील ताण दुर होईल. त्याच्या बोलण्याकडे तिने दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याने तिला बळजबरी ते शितपेय प्राशन करण्यास भाग पाडले.
ते शितपेय घेतल्यानंतर तिला गुंगी आल्यासारखे वाटू लागले. तिच्या नजरेसमोर समोरचे अस्पष्ट दिसू लागले. मात्र तिला काही प्रमाणात समजत होते. त्याचवेळी सागरचा मित्र रमेश तेथे आला होता. तिचा पती सागर व त्याचा मित्र रमेश या दोघांनी तिला बळजबरी बाथरुम मधे नेले. तिला तिच्याच पतीने अर्थात सागरने पकडून ठेवले. त्यानंतर रमेश काकडे याने तिच्यासोबत नको ते कृत्य करण्यास सुरुवात केली.पतीच आपल्या पत्नीला मित्राच्या हवाली करत होता. त्याला आपल्या नजरेसमोर चुकीचे कृत्य करण्यास मदत करत होता.
पतीचा मित्र व्हिलन होता हे स्पष्ट होते मात्र पती देखील व्हिलन झाला होता. अतिशय घृणास्पद प्रकार त्यावेळी सायलीसोबत झाला. दुस-या दिवशी सकाळी तिने हा सर्व प्रकार रडत रडत माहेरी व सासू सास-यांच्या कानावर घालणार असल्याचे पती सागर यास सांगितले. त्यावेळी सागरने तिला धमकी दिली की तु जर कुणाला सांगितले तर मी आत्महत्या करुन घेईन. रात्री घडलेला प्रकार मी मोबाईलमधे शुट केलेला आहे. ती शुटींग मी व्हायरल करेन अशी धमकी त्याने तिला दिली.
या प्रकारामुळे सायलीची तब्येत बिघडली होती. त्यामुळे सागरने तिला 17 जून रोजी माहेरी धुळे येथे सोडून दिले. माहेरी आल्यावर सायली उदास राहू लागली. तिच्या वहिणीने तिची सखोल विचारपुस केली असता सायलीने खरा प्रकार कथन केला. त्यामुळे या प्रकाराबाबत पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करुन नराधम पतीला अद्दल घडवण्याचे तिने ठरवले.
त्यामुळे तिने माहेरच्या मंडळींना सोबत घेत जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशन गाठले. तिने सर्व प्रकार जिल्हा पेठ पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस निरिक्षक अकबर पटेल यांच्या कानावर घातला. पो.नि. अकबर पटेल यांनी तिची कैफीयत ऐकून घेतली. या प्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती व मित्र रमेश काकडे या दोघांविरुद्ध रितसर कायदेशीर गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न.299/20 भा.द.वि. 328, 376, 377, 506 व 34 अन्वये दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संदिप परदेशी यांच्याकडे देण्यात आला.
त्यानंतर रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पो.नि. अनिल बडगुजर रुजू झाले. त्यांनी याप्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी आपली सुत्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. याकामी तपास अधिकारी स.पो.नि. संदिप परदेशी यांच्यासह सुनील पाटील, रुपेश ठाकुर, भुषण पाटील, तुषार विसपुते, होमगार्ड स्वप्निल निकम यांनी परिश्रम घेण्यास सुरुवात केली.
रवीवार दि.20 सप्टेबर रोजी जळगाव बस स्थानकातून पळून जाण्याच्या बेतात असतांना आरोपी पती सागर यास रामनंद नगर पोलिसांच्या पथकाने अटक केली. पो.नि. अनिल बडगुजर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिडीतेचा पती बसने पळून जाण्याच्या बेतात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून स.पो.नि. संदिप परदेशी यांच्या सह सुनील पाटील, रुपेश ठाकुर, भुषण पाटील, तुषार विसपुते, होमगार्ड स्वप्निल निकम आदींनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करण्यात आली.
त्यानंतर मंगळवार 22 सप्टेबर रोजी पिडीत महिलेच्या पतीचा नराधम मित्र रमेश काकडे याला देखील जळगाव शहरातील वाल्मिक नगर परिसरातून अटक करण्यात आली.