पुणे : स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन १७८ विद्यार्थ्यांचे गुण वाढविण्यासाठी मुल्यमापन प्रमुख संदीप हेंगले याने तब्बल २० लाख रुपये घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. संदिप हेंगले याने सुमित अग्रवाल याच्याकडे ११ हजार विद्यार्थ्यांचा डाटा हस्तांतरीत केला होता. सायबर पोलिसांच्या कारवाईत ही माहिती पुढे आली आहे.
सुमित मुरारीलाल अग्रवाल (३५), अलवर, राजस्थान यास सायबर पोलिसांनी अटक केली. यापुर्वी मुल्यमापन प्रमुख संदीप रामकृष्ण हेंगले याला अटक करण्यात आली आहे. हेंगले सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
हा प्रकार मॉडेल कॉलनीतील सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीत सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत घडला. संदीप हेंगले हा सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा मुल्यमापन विभागाचा प्रमुख होता. हेंगले याने सुमित अग्रवाल सोबत संपर्क साधत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन १७८ विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याचे उघड झाले.
हेंगले आणि अमित अग्रवाल यांचा सन २०१८ पासून संपर्क आहे. संदीप हेंगले याने सुमित अग्रवाल सोबत संपर्क साधण्यासाठी दोन वेगवेगळ्या नावाने ई मेल आय डी तयार केले होते. त्या माध्यमातून संदिप हेंगले हा सुमित अग्रवाल सोबत संपर्क साधत होता. हेंगले याने सुमित यास सिंबायोसिसच्या ११ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा डेटा दिला होता. त्या डेट्यामध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थींचे संपर्क क्रमांक होते. सुमित अग्रवाल हा संबंधित अनुतीर्ण विद्यार्थ्यांशी संपर्क साधत त्यांच्याकडून पास करुन देण्यासाठी पैसे घेत असे. जे विद्यार्थी पैसे देत, त्यांचे पैसे व यादी सुमित अग्रवाल हेंगले यास पाठवत असे. सुमित अग्रवाल याने विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या रकमे पैकी २० लाखाहून अधिक रुपये हेंगले यास दिले आहे. पोलिसांनी सुमित याला अटक करुन न्यायालयात हजर केले. त्यास न्यायालयाने २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.