जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): एक सुखी चौकोनी परिवार….हम दो हमारे दो ….. या ब्रिदवाक्यानुसार सुखी दाम्पत्याचे जीवन…परिवारात दोन चिमुकली मुले आणि त्या परिवारात डोकावणारा एक व्हिलन अर्थात खलनायक …… आणि त्या हसत्या खेळत्या परिवाराची सामुहिक आत्महत्या…..शोकांतिका अर्थात ट्रॅजेडीने भरलेली ही एखाद्या चित्रपटाची कथा नसून एक वास्तव कथा आहे. जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा या गावातील ही सत्यकथा असून रेल्वे रुळावर धावत्या रेल्वे खाली या परिवाराचा शेवट झाला. काय आहे या घटने मागचे वास्तव……कशी घडली ही घटना…….

जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा हे गाव. या गावात सुनिल अमृत भिल हा अवघा 28 वर्ष वयाचा तरुण आपल्या परिवारासह रहात होता. सुनिल भिल हा त्याची पत्नी पार्वती, वयोवृद्ध आई आणि दोन मुलांसह रहात होता. हातमजुरी करुन सुनिल आपल्या परिवाराचा गाडा ओढत होता. गावात काम मिळाले नाही तर तो परिवारासह पुणे, दौंड आदी परिसरात उसतोडीच्या कामासाठी देखील जात होता. परिवाराचा आर्थिक स्त्रोत जेमतेम होता. भोग सरलं…. सुख येईल ….. असे मनाशी म्हणत सुनिलची पत्नी पार्वती संसाराचे हित जपत होती.
सुनिल आणि पार्वती या दोघा पती पत्नीचा सुख दुखा:ने भरलेला संसार सुरु होता. संसार, मुलांचे भविष्य आणि रोजच्या जगण्याची त्यांची धडपड सुरु होती. सर्व काही व्यवस्थित सुरु असतांना सुनिल आणि पार्वतीच्या जीवनात एक डोकेदुखीचा विषय सुरु झाला. त्यांच्या जीवनात बाहेरची व्यक्ती व्हिलनच्या रुपात डोकावू लागली. त्या व्हिलन रुपी व्यक्तीचे नाव होते….सिताराम उर्फ गटलू भिल.

सिताराम उर्फ गटलू भिल याची सुनिलच्या पत्नीवर वाईट नजर होती. तो सरळमार्गी सुनिलवर दडपशाहीचे धोरण अवलंबत होता. माझे तुझ्या पत्नीसोबत xxxxx आहे, तु मधे येवू नको असा सरळसरळ दम तो सुनिल यास देऊ लागला. अवघ्या 28 वर्षाच्या सरळमार्गी सुनिलची दांडगाई करणा-या सितारामच्या धमकीमुळे त्रेधा उडत होती. तो आपली मनातील भिती त्याची बहिण सरलाबाईला फोनवर कथन करत होता.
माझे तुझ्या पत्नीसोबत लफडे आहे…. तु मधे येऊ नकोस असे गावातील सिताराम हा सुनिल भिल यास सांगत होता. आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचे आपल्याला आपल्याच घरात येऊन सिताराम सांगत असल्याचे बघून सुनिलची मानसिकता बिघडली होती. बघता बघता सितारामची भिड चेपली. दिनांक 26 ऑगस्ट रोजी सिताराम याने थेट सुनिल यास प्रखर स्वरुपाची धमकी दिली. तुझ्या बायकोसोबत माझे xxxxx आहे, तु मधे आलास तर तुला आणि तुझ्या मुलांना मारुन टाकेन. तुला चालत नसेल तर मरुन जा….. अशी सिताराम याने सुनिल यास धमकी दिली. त्याच्या या धमकीने सुनिल मनातून पार खचला. काय करावे हे त्याला सुचेनासे झाले. धमकी देण्यासाठी तावातावात आलेला सिताराम धमकी देऊन तावातावात निघून गेला होता.

घडलेला प्रकार सुनिलने त्याच्या बहिणीच्या कानावर घातला. पलीकडून मोबाईलवर बोलणा-या सुनिल यास त्याच्या बहिणीने समजावले. तु घाबरु नकोस आम्ही येऊन सिताराम यास समजावतो असे म्हणत घाबरलेल्या सुनिलची त्याच्या बहिणीने समजूत घातली. या संभाषणा दरम्यान सुनिलने त्याच्या बहिणीला सांगितले की आमच्या घरात लाल रंगाची डायरी आहे. त्यात नातेवाईकांचे फोन नंबर आहेत. त्या फोन नंबरवरील सर्वांना या घटनेबाबत कळवण्याबाबत सुनिलने त्याच्या बहिणीला सांगितले. त्यानंतर ती रात्र कशीबशी पार पडली.
त्यानंतर दुसरा दिवस अर्थात 27 ऑगस्टचा दुर्दैवी दिवस उजाडला. सकाळी सात वाजता एका नातेवाईकाकडून सुनिलच्या विवाहीत बहिणीला समजले की सुनिल, त्याची पत्नी पार्वती आणि त्यांच्या दोघा मुलांचे मृतदेह टाकरखेडा शिवारातील रेल्वे लाईनवर आढळून आले आहेत. हा सामुहिक आत्महत्येचा प्रकार आहे. माहिती मिळताच चोपडा तालुक्यात राहणारी सुनिलची बहिण नातेवाईकांसमवेत घटनास्थळी पोहोचली. दरम्यान या घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाकडून अमळनेर पोलिसांना देण्यात आली होती. अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम आपल्या सहका-यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. पुढील कायदेशीर कारवाई दरम्यान चौघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकामी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले होते.

मयत सुनिलची बहिण सरलाबाई घटनास्थळी दाखल झाली तो पर्यंत चौघांचे मृतदेह रुग्णालयात रवाना झाले होते. त्यामुळे तिने दवाखान्यात धाव घेतली असता चौघांचे मृतदेह पोस्टमॉर्टम रुममधे दाखल झाले होते. मयत सुनिलची बहिण सरलाबाईने दिलेल्या फिर्यादीनुसार या सामुहिक आत्महत्येप्रकरणी संशयीत सिताराम उर्फ गटलु तानकु भिल याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.

भल्या पहाटे सर्व गावकरी साखरझोपेत असतांना एकाच कुटूंबातील चौघांच्या सामुहिक आत्महत्येची घटना घडली होती. घरात एकटी वयोवृद्ध आई होती. तिला एकटीला सोडून चौघे जीव घर आणि जग सोडून कायमचे निघून गेले होते. या घटनेवेळी आपण या जगातून कायमचे जात असल्याचे कदाचीत एकट्या सुनिलला माहिती असावे. आपण गावी जात आहोत असे सांगून कदाचीत सुनिलने पत्नी आणि निरागस निष्पाप मुलांना सोबत रेल्वे रुळानजीक आणले असावे. धावती रेल्वे जवळ येताच सुनिलने पत्नी पार्वती आणि मुलांना घट्ट पकडून रेल्वेखाली झोकून दिले. भरधाव रेल्वेच्या धडकेने चौघे जीव एका क्षणात जीवाला मुकले ते कायमचे. आणि या सर्व घटनेमागे दडली होती गावातील सिताराम उर्फ गटलु भिल याची खलनायकी ….. तशा आशयाचा आरोप मयत सुनिलची विवाहीत बहिण सरलाबाईने पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत केला.
एका घरातील चार जीव एकाच वेळी गेले आणि मागे उरले असंख्य प्रश्न. या प्रश्नांची उत्तरे मोबाईल कॉल रेकॉर्ड, संबंधित व्यक्तींचे जबाब, घटनास्थळाचा पंचनामा आणि इतर उपलब्ध पुरावे यातून पुढे येणारच आहे. तक्रारीतील आरोप आणि प्रत्यक्ष गुन्हा सिद्ध होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नेमके सत्य तपासातूनच समोर येणार आहे.
या प्रकरणातील सर्वांत अस्वस्थ करणारा भाग म्हणजे सुनिल भिल हा एकटा गेला नाही. त्याने पत्नीसह दोन निष्पाप मुलांना देखील जिवानिशी आपल्यासोबत नेले. ज्या निष्पाप बालकांनी या जगाची व्यवस्थित तोंड ओळख देखील केली नव्हती त्या निष्पाप बालकांना त्याने मृत्युच्या दाढेत ढकलले होते. मुलांचा या वादाशी काय संबंध? त्यांनी काय चूक केली होती? पत्नीवर माझा पुर्ण विश्वास आहे असे देखील त्याने मृत्युपुर्वी बहिणीसोबत मोबाईलवर बोलतांना सांगितले होते असे समजते.
एका कुटुंबातील चार जीवांचा अंत होण्यापूर्वी घराच्या चार भिंतींमध्ये किती तणाव साचला होता? रक्षा बंधनापुर्वी बहिणीची वाट बघण्याची देखील सुनिलने वाट पाहिली नाही. मरणाला सामुहिकपणे सामोरे जाण्याची सुनिलला एवढी काय घाई झाली होती असा एक प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे. पोलिस त्यांच्या दृष्टीने कायदेशीर तपास करतील मात्र या घटनेतून समाजापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
गुन्हेगारी घटनांमध्ये आपण अनेकदा खून, मारामारी, चोरी किंवा दरोड्याची चर्चा करतो. पण मानसिक छळ अनेकदा आपल्याला दिसतच नाही. मानसिक छळाची जखम आणि त्या जखमेचे रक्त कुणाला दिसत नाही. मानसिक छळ करतांना समोरच्या व्यक्तीच्या हातात शस्त्र नसते. त्याची जीभ हेच त्याचे शस्त्र असते. सततचे टोमणे, अपमान, धमक्या, संशय निर्माण करणारे बोलणे आणि एखाद्याच्या वैवाहिक आयुष्यात केलेला हस्तक्षेप माणसाला आतून तोडू शकतो. सुनिल भिल आणि त्याच्या परिवाराची शोकांतिका त्या अदृश्य जखमेची भीषण आठवण करून देते.
एखाद्या व्यक्तीला वारंवार धमकी दिली जात असेल, तिच्या कुटुंबाबाबत अपमानास्पद बोलले जात असेल किंवा ती व्यक्ती मानसिक तणावात असल्याचे सांगत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. “घरचा विषय आहे, आपोआप मिटेल” असे म्हणत शांत बसणे कधी कधी धोकादायक ठरू शकते. कुटुंबीयांनी जवळच्या व्यक्तीसोबत संवाद साधणे गरजेचे असते. अशा वेळी पिडीत व्यक्तीने विश्वासू व्यक्तीची मदत घेतली पाहिजे. परिस्थिती गंभीर असल्यास पोलिस किंवा संबंधित मदत व्यवस्थेशी संपर्क साधायला हवा.
या दुर्दैवी घटनेत टाकरखेड्यानजीक रेल्वे रुळाजवळ त्या दिवशी चार मृतदेह सापडले. पण त्या रुळांवर केवळ चार जीव संपले नाहीत…एका कुटुंबाची स्वप्ने, मुलांचे भविष्य आणि एका बहिणीचा भाऊ कायमचा हरपला. तक्रारीत करण्यात आलेले सिताराम भिल यांच्यावरील आरोप तपासात कितपत खरे ठरतात? फोन कॉल्स आणि साक्षीदार काय सांगतात? आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चार जीवांना त्या टोकापर्यंत नेणाऱ्या मानसिक छळाची खरी साखळी नेमकी कुठून सुरू झाली होती? या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येतील. कारण कधी कधी गुन्ह्याची सुरुवात हातातल्या शस्त्राने होत नाही…ती एखाद्या शब्दाने होते.






