न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले दिल्लीच्या पत्रकारावर

मुंबई : बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनची सध्या एनसीबीकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीबाबत वृत्त संकलन करण्यासाठी दररोज एनसीबी कार्यालयासमोर पत्रकारांची गर्दी असते. आज सकाळी पत्रकारांमध्येच जुंपण्याचा प्रकार घडला. या घटनेत पत्रकारांमध्ये अचानक बाचाबाची सुरु झाली. त्यामुळे काही वेळ गोंधळ उडाला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद आणि तणाव मिटला.

एनसीबी कार्यालयासमोर वृत्त संकलन करतांना दररोज एका न्यूज चॅनेलचा पत्रकार आरडाओरड करुन कव्हरेज घेत असे. त्याच्या अशा कृत्यामुळे इतर पत्रकारांना लाईव्ह कव्हरेज घेतांना नेहमी अडचणींचा सामना करावा लागत होता.

आज कव्हरेज सुरु झाल्यानंतर त्या पत्रकाराने इतर पत्रकारांना निकृष्ट दर्जाचे शब्द वापरुन हिणवले. त्यामुळे मुंबईचे पत्रकार संतप्त झाले. दिल्लीहून आलेल्या त्या न्युज चॅनलच्या पत्रकाराने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुंबईकर विरुद्ध दिल्लीचा पत्रकार असे चित्र निर्माण झाले. हा वाद धक्काबुक्कीपर्यंत गेला. मुंबई पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाद मिटवला.

ड्रग्स प्रकरणी सिमॉन खंबाटाची गेल्या अनेक तासांपासून चौकशी सुरु होती. त्यामुळे सकाळपासूनच सर्व पत्रकार एनसीबी कार्यालयासमोर एकत्र आले होते. यावेळी पत्रकारांना बातमी कव्हर करण्यासाठी जागा देण्यात आली होती. या जागेवर उभे राहण्यावरून दोन पत्रकारांमध्ये वाद सुरु झाला. शिवाय एका चॅनेलचा पत्रकार आरडाओरड करत बातमीचे कव्हरेज घेत होता. त्याने इतरांना कव्हरेज घेतांना वारंवार व्यत्यय आणला. त्यामुळे इतर पत्रकारांनी आरडाओरड करणा-या पत्रकाराला समज देण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र त्याने इतर पत्रकारांना काही अपशब्द वापरुन हिणवले. तेथून वादाला सुरुवात झाली. मात्र पोलिसांनी हा वाद मध्यस्तीने मिटवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here