नवी दिल्ली : ग्राहकांच्या संख्येत भारती एअरटेलने रिलायन्स जिओला मागे टाकले आहे. जून महिन्यात रिलायन्स जिओ इन्कोकॉमने आपले तब्बल २१ लाख मोबाईल ग्राहक गमावले आहेत. व्होडाफोन आयडियाला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले आहे. जून महिन्यात व्होडाफोन या कंपनीनं ३७ लाख ग्राहक गमावले. भारतीय टेलिफोन नियामक प्राधिकरणानं (ट्राय) याबद्दलची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
एअरटेलच्या सक्रिय ग्राहकांची संख्या वाढून ती ३१ कोटी १० लाखांच्या घरात गेली आहे. एअरटेलने जिओला काही फरकाने मागे टाकलं आहे. जिओच्या सक्रिय ग्राहकांची संख्या ३१ कोटी एवढी आहे. व्होडाफोन आयडियाच्या सक्रिय ग्राहकांची संख्या २७ कोटी ३० लाख एवढी आहे. मे महिन्यात जिओ प्रथम क्रमांकावर होते. जून महिन्यात एअरटेलने जिओला मागे टाकले आहे. त्यामुळे आता एअरटेल हा देशात प्रथम क्रमांकावर आहे.
व्हिजिटर लोकेशन रजिस्टरच्या माध्यमातून सक्रिय मोबाईल ग्राहकांची संख्या मोजली जाते. ट्रायच्या आकडेवारीनुसार एअरटेलचे ९८.१४ टक्के ग्राहक सक्रिय आहेत. व्होडाफोन आयडियाच्या सक्रिय ग्राहकांचे सरासरी प्रमाण ८९.४९ टक्के एवढे आहे. या तुलनेत जिओ दोन्ही कंपन्यांपेक्षा बरीच मागे आहे. जिओचे सक्रिय ग्राहक ७८.१५ टक्के एवढे आहेत.
जून महिन्यात देशातील सक्रिय मोबाईल सेवा ग्राहकांची संख्या ९५ कोटी ८० लाख एवढी होती. मे महिन्याच्या तुलनेत जून मध्ये सक्रिय ग्राहकांची संख्या २८ लाखांनी कमी झाली. याचा फटका जिओ सह व्होडाफोन – आयडियाला बसला. या कालावधीत जिओने ग्रामीण भागात मोठा विस्तार केला. जिओने ग्रामीण भागातील व्होडाफोन आयडियाचे वर्चस्व मोडून काढले. ग्रामीण भागात जिओचे १६ कोटी २३ लाख ग्राहक असून व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांची संख्या १६ कोटी ६ लाख एवढी आहे.