जळगाव : जळगाव तालुक्यातील वावडदा येथील एल.एच.पाटील इंग्लिश मिडियम (सीबीएससी) शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका जयश्री पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे. जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. सन २०२०-२१ या वर्षासाठी राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुरस्काराच्या रुपाने त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खान्देश कुणबी मराठा वधु वर परिचय गृप तथा गौरी गृप वावडदा चे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते जयश्री पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सुमित पाटील यांनी म्हटले की शिक्षक आपल्या देशाचे भविष्य विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घडवत असतात. विद्यार्थी हे उद्याचे नागरिक असतात. या उद्याच्या नागरिकांना योग्य त्या रुपात घडवून देशाचे भविष्य उज्वल करण्याचे काम शिक्षक आपल्या परिने करत असतात. जयश्री पाटील यांच्या कार्याची योग्य ती दखल घेवून त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे सुमीत पाटील यांनी आवर्जून सांगीतले.
जयश्री पाटील यांना मिळालेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार हा निश्चीतच प्रशंसनीय असून त्या माध्यमातून त्यांना व विद्यार्थी वर्गाला प्रोत्साहन मिळण्यास मदत मिळणार असल्याचे प्रमुख पाहुणे सुमित पाटील यांनी यावेळी कथन केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त जयश्री पाटील या नेहमीच प्रयत्नशील असतात. या पुरस्काराच्या माध्यमातून त्या ख-या अर्थाने मानकरी ठरल्या आहेत. जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी अनेक विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. यावेळी मंचावर राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.एस.डी.वाघ यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.