शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका पंचतारांकीत हॉटेलात गुप्त भेट घेवून स्नेह भोजन देखील बातमी फुटली आणि गदारोळ माजला. तसा तो माजला नसता तरच नवल म्हणायचे. राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. रा.कॉ. ,-कॉंग्रेस आणि शिवसेना अशा भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी एकत्र येत भाजपाच्या सत्तेचा तोंडी आलेला घास पळवल्यामुळे गल्ली पासून दिल्ली पर्यंत भाजपा खवळला असणारच. त्यातच कोरोना महामारी – लॉक डाऊनचे संकट उद्भवले. शिवसेनेचा मुख्यमंत्री आणी मुख्यमंत्र्यांचा तरुण पुत्र आदित्य पर्यटन मंत्री बनल्याने अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या होत्याच. कोणताच अनुभव नसलेल्या फडणवीस यांना कॅप्टन बनवल्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त करणारे भाजपाने मंत्रीपदावरुन घालवलेले एकनाथराव खडसे यांनीही शिवसेनेनेचे नवे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतल्याची छायाचित्रे झळकली होतीच.
याच खडसे यांनी भाजपा सेनेची युती तोडल्याबद्दल तेव्हा शिवसेनेने भाजपा पेक्षा खडसे यांच्यावरच जोरदार आगपाखड केली होती. मंत्रीपद घालवण्यापासून तिकीटही नाकारण्यापर्यंत भाजपा नेतृत्वाने खडसे यांची पुरती नाकाबंदी केली. रोज भाजपावर प्रहार करणारे खडसे मला भाजपात गृहीत धरु नका म्हणत म्हणत अलीकडे त्यांनी अन्यायाला देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा जाहीर आरोप केला. शिवाय वृत्तपत्रे-न्युज चॅनल्सवर अन्यायाचा पाढा वाचला.
फडणवीस विरोधी कॅंपने देखील आगीत तेल ओतले. अशातच गेल्या जून महिन्यात सुशांतसिंग राजपूत नामक सिने अभिनेत्याचे संशयास्पद आत्महत्या प्रकरण समोर आले. हा अभिनेता मुळचा बिहारचा. बिहार विधानसभा निवडणूका तोंडावर असल्याने की काय तेथील मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. लगेच केंद्राने ती मान्य केली. तत्पुर्वी सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात सुशांतची फॅमीली आक्रमक झाली. बिहारात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे या सिने अभिनेत्याची कथित आत्महत्या ही हत्या असल्याची हाकारी सुरु झाली. त्यात कंगना राणौत नामक अभिनेत्रीने फिल्मी दुनियेतील “कंपूशाही” या क्षेत्रात दादागिरी करुन नवागतांचे करीअर संपवतात यावर प्रकाश टाकला. त्यातच फिल्मी दुनियेत चालणा-या ड्रग्ज पार्ट्या, अंमली पदार्थाचे सेवन , दारु-भांग-गांजा, हेरॉईन, एमडी ची नशा, चरस, रेव्ह पार्टीजचे मुद्दे गाजवले जाताहेत.
दरम्यान सुशांत सिंग प्रकरणात रिया चक्रवर्ती, दिशा सालीयान, कंगणा रणौत प्रकरणाची उप कथानके जोडली गेली. संजय राऊत – कंगणा वाद गाजला. कंगणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेला आव्हाने दिली. या दरम्यान सुशांत केस प्रकरणात एनसीबीने ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे खणून काढतांना रिया चक्रवर्ती, दिपीका पदुकोण, करिश्मा, ड्रग पेडलर्स यांच्यासह शेकडो फिल्मी कलाकार-राजकीय नेते रडारवर घेतले. सुशांत प्रकरणातच महाराष्ट्र पोलिस विरुद्ध बिहार पोलिस असा वाद झाला. त्यात उप मुख्यमंत्री अजितदादा पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सीबीअय चौकशीची मागणी केल्याने रा.कॉ. त वादळे आली. दरम्यान सुशांत केस प्रकरणाचा बिहारात राजकीय लाभ उठवणे, देवेंद्र फडणवीसा यांना बिहार निवडणूकीत प्रभारी नेमण्यात आले.
दरम्यान राज्यात सत्तारुढ महविकास आघाडी सरकार पाडण्याच्या पुड्या सोडल्या जाताहेत. शिवसेना नेतृत्वाचे सरकार घालवण्यासाठी टपून बसलेल्या भाजपाने अनेक आघाड्यांवर मोहीम उघडली आहे. त्याचा एक भाग म्हणून रिपब्लिक टी.व्ही.चे पत्रकार अर्नव गोस्वमी, कंगणा राणौत यांनी शिवसेनेला शिंगावर घेतले आहे. कंगनाने शिवसेनेचे घर तुटेल अशी शापवाणी घोषित केली.
रिपब्लिक टी.व्ही. चा अर्णव गोस्वामी याने प्रचंड तार स्वरात सुशांत राजपूत-दिशा सालीयान, बॉलीवूड ड्रग्ज माफीया, संजय राऊत, बाबा पेंग्वीन, बेबी पेंग्वीन यांना धमकावत आहे. कंगणा आणी अर्णव गोस्वामीच्या प्रचंड आरडाओरडसह केल्या जाणा-या मा-यात ड्रग्ज पार्टीसह खून प्रकरणात शिवसेना मंत्र्यांचा संबंध जोडून दाखवण्याचा आटापिटा होत आहे. त्यात शिवसेनेचा कोणता मंत्री भरडला जाईल हे एव्हाना लोकांच्या ओठी आणण्यात दिल्लीचे नेपथ्य रचनाकार ब-यापैकी यशस्वी झाले आहेत.
भाजपाच्या रोकड रसदीवर पोसलेली पत्रकारांची टीम ही हाच धुराळा उडवत आहे. त्यामुळे ज्यांनी टार्गेट करुन एका मंत्र्याचे करिअर उध्वस्त करण्याचे मनसुबे रचले त्यांचा तो खेळ रोखण्यासाठीच संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने दिल्लीश्वरांकडे मध्यस्तीसाठी फडणवीस यांना विनंती करण्याच्या हेतूने संजय शिष्टाई केल्याचे म्हटले जात आहे. शिवसेनेच्या अडचणीत आता फडणवीस यांनी मदत का करावी? दिल्लीश्वरांवर खोटारडेपणाचा आरोप करणारांवर फुकट कृपावर्षाव का करावा? अशा प्रश्नांवर भावी काळात राजकीय सौदेबाजी होवू शकते. या सौदेबाजीस निमुटपणे तयार असाल तरच एखादा शब्द टाकला जावू शकतो.
शिवसेनेच्या “पर्सनल” प्रॉब्लेमसाठी महाविकास आघाडी सरकारचे भवितव्य पणाला लावले जात असल्याच्या आशंकेनेच रा.कॉ.चे शरद पवार आणि कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी तातडीने धाव घेवून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. एकीकडे भाजपातले नाराज बंडोबा एकनाथराव खडसे यांच्या रा.कॉ. प्रवेशाचे पडघम वाजू लागताच रा.कॉ शक्तीमान होण्यापुर्वीच त्याचा शक्तीपात घडवून आणण्याची खेळी करण्यात “बिभीषण प्रवृत्ती” टपून बसलेल्या असतातच.
शेवटी प्रचंड स्वार्थासाठीच राजकारण केले जाते. स्वार्थासाठी राजकारणात अलिकडे नात्यागोत्यात खून पाडले जातात. कौटूंबिक हिताचा बळी देणे, विश्वासघात करणे शिवाय स्वार्थाच्या दिशेने हुक अडकवण्याची खेळी केली जाते. तेच आता शिवसेनेने केले असावे असा राजकीय निरिक्षकांचा होरा आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेत राष्ट्रवादी कॉंग्रेस कॉंग्रेसला काय मिळणार यापेक्षा तिस-यापुढे काय वाढून ठेवले जाणार याच्या अंदाजाने सत्तेचे हे एक जहाज बुडवून कार्यभाग साधण्यासह दुस-या जहाजात जागा रिझर्व्ह करण्याचा डाव तर खेळला जात नाही ना?
संजय राऊत म्हणतात ती देवेंद्र फडणविसांची झालेली गुप्त भेट हिच ती मुलाखत केव्हाच आटोपली म्हणायची. अर्थात फडणवीस आणि राऊत दोघेही चतुर खिलाडी असल्याने “सामना” ने न घेतलेल्या अनकट मुलाखतीची गोष्ट सांगून या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या चातुर्याचा परिचय करुन दिला आहेच. कारण दिल्लीच्या नेपथ्य रचनेत देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करणार नाही असे म्हटले जाते.
तरीदेखील राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू वा मित्र नसतो. कालचा शत्रू उद्याचा मित्र अशी सोय करुन ठेवलेली आहे. त्यासाठी शेरो शायरीचा आधार देखील घेतला जातो ते बघा.
दिल मिले ना मिले हाथ तो मिलाते रहो
दुश्मनी करो तो जम के करो. पर कभी हाथ मिलाने की नौबत आये तो शर्मिंदगी महसूस ना करो.
शर्म-हया ये तो औरतो का गहना —–हम तो ठहरे मर्द हमे उससे क्या लेना – देना?
सुभाष वाघ (पत्रकार)
8805667750