मुंबई : लॉकडाऊन काळात लालपरी अर्थात एसटीची चाके एकाच जागी उभी होती. त्यानंतर सुरु झालेल्या बससेवेत केवळ निम्म्या प्रवाशांवर सेवा सुरु झाली. मात्र त्यातून देखील उत्पन्न फारसे मिळत नव्हते. त्यातच पगार थकल्यामुळे एस.टी. बस कर्मचारी हवालदिल झाले होते. आता बस पुर्ण आसन क्षमतेने धावत आहे.
कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न अखेर अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी सोडवला आहे. त्यांनी याबद्दल ट्वीट करून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासादायक वृत्त दिले आहे. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार येत्या गुरूवारी दिला जाणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरद्वारे दिली.
‘एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनाबाबत परिवहन मंत्री अनिल परब यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेत माहिती दिली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे पवार यांनी मान्य केले आहे. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारच्या आत त्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. उर्वरीत वेतन देखील लवकरच दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापुर्वी देखील ऑगस्ट महिन्यात एसटी कामगारांच्या थकीत वेतनाचा प्रश्न पुढे आला होता. त्यावेळी राज्य शासनाने निधी मंजूर केला होता. त्यावेळी मार्च आणि एप्रिल महिन्यातील थकीत पगार कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केला होता. मार्च महिन्यातील थकीत 50 टक्के, एप्रिलचे 75 टक्के व मे महिन्याचे 100 टक्के थकीत वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते.
ऑगस्ट महिन्यात अजित पवार यांनी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर केले होते व वितरीत देखील केले होते. थकीत पगार दिल्यानंतर 20 ऑगस्टपासून राज्यात एसटी बस सेवा सुरु झाली होती. मात्र कोरोनाच्या सावटाखाली सुरुवातील एका आसनावर एकच प्रवाशी अशा तत्वावर बससेवा सुरु करण्यात आली. आता बस पूर्ण आसन क्षमतेने सुरु झाली आहे.