नाशिक : नाशिक रोड, देवळाली कॅम्प गांधीनगर या भागात फोटो काढण्यास बंदी आहे कारण हा भाग लष्कराच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील समजला जातो. नाशिक शहरातील देवळाली लष्करी सैनिक रुग्णालय आवारात मोबाईलद्वारे फोटो काढणा-या तरुणास सैन्याच्या जवानांनी ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संजीव कुमार (21) असे पोलिसांच्या ताब्यातील तरुणाचे नाव असून तो मुळचा आलापुर जि. गोपालगंज, बिहार येथील रहिवासी आहे. त्याने काढलेले फोटो पाकिस्तानातून ऑपरेट केल्या जाणा-या व्हाटस गृपमधे पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे.
कर्तव्य बजावणा-या जवानांनी संशयित संजीव कुमार यास आज शनिवारी सायंकाळी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्याच्याविरुद्ध रितसर गुन्हा नोंद करण्यात आला.
नाशिक रोड, देवळाली कॅम्प गांधीनगर या भागात भारतीय तोफखाना केंद्र, आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल, स्कुल ऑफ आर्टिलरी देवळाली अशी महत्वाची ठिकाणे आहेत. या लष्करी केंद्र परिसरात सर्वसामान्य व्यक्तींना प्रवेश नसून बंदी आहे. तसेच या भागात विनापरवाना फोटो, व्हिडीओ काढण्यास सक्त पाबंदी आहे.
पोलिसांच्या ताब्यातील तरुण लष्करी हद्दीत एका निर्माणाधीन बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मजुरी करतो. हा संशयित मजुर संजीव कुमार फोटो काढत असतांना जवानांना आढळून आला. त्यास ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला.
या प्रकरणी लष्करी अधिकारी ओमकार नाथ यादव यांच्या फिर्यादीनुसार शासकीय कार्यालयीन गोपनीयता अधिनियम 1923च्या कलम 3 व 4 अन्वये रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.