जळगाव : जामनेर तालुक्यातील पहुर जांभूळ रस्त्यावर झालेल्या लुटीप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. काल रात्री नऊ वाजता हा लुटीचा प्रकार घडला होता. या घटनेतील तिघा लुटारुंना पहुर पोलिसांनी अटक केली आहे.
पहुर येथील शेतकरी अॅग्रो सेंटरचे संचालक राजू धोंडू पाटील हे काल रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी जात होते. त्यावेळी त्यांच्या समवेत अविनाश पवार हा साथीदार होता. वाटेत त्यांचा पाठलाग करणा-या तिघा दुचाकीस्वारांनी राजु पाटील यांच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून रोखण्याचा प्रयत्न केला.
एकाने त्यांच्या खिशातील एक हजार रुपये हिसकावून घेतले. उर्वरीत दोघांनी त्यांच्या ताब्यातील विस हजार रुपये रोख असलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. या झटापटीत विस हजार रुपये रोख असलेली बॅग कुठेतरी अंधारात पडली.
रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकाराने राजू पाटील व त्यांचा सहकारी अविनाश पवार हे दोघेही घाबरुन गेले. ते दोघे दुचाकीने पुन्हा मागे कमानी तांडा गावापर्यंत आले. त्याठिकाणी त्यांना विष्णू चव्हाण व योगेश राठोड हे दोघे गावकरी भेटले. त्यांनी त्याला घडलेला प्रकार कथन केला.
राजु पाटील यांनी त्यांची दुचाकी तेथेच ठेवून रिक्षाने पिंपळगाव येथे आले. काही वेळाने त्यांना समजले की एक पल्सर मोटार सायकल भरधाव वेगाने पिंपळगाव बुद्रुक गावाच्या दिशेने गेली आहे. माहिती मिळताच गावक-यांच्या मदतीने तिघा लुटारुंना पकडण्यात आले. या घटनेची माहिती पहुर पोलिसांना देण्यात आली.
पहुर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक राकेशसिंग परदेशी, भरत लिंगायत, ज्ञानेश्वर ढाकणे आदींनी घटनास्थळी धाव घेत तिघा लुटारुंना ताब्यात घेत अटक केली. आरोपी अनिकेत कडुबा चौधरी, गोपाळ सुखदेव भिवसने, चेतन प्रकाश जाधव यांच्याविरुद्ध भा.द.वि. 394 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघा आरोपींनी पाळत ठेवून लुटीचा प्रकार केला होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे व त्यांचे सहकारी भरत लिंगायत, ज्ञानेश्वर बाविस्कर करत आहेत.