मुंबई : एमपीएससीची परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला असतांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली भूमिका जाहीर केली. नियोजीत तारखेला अर्थात 11 ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसारच ही परीक्षा होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. परीक्षा आणि भरती या दोन्ही प्रक्रिया शासन निर्णयानुसार होणार असल्याचे देखील आयोगाने म्हटले आहे.
काही मराठा संघटनांनी या परिक्षेला विरोध दर्शवला होता. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा तिढा निकाली निघत नाही तोवर या परीक्षा स्थगित ठेवण्याची मागणी काही मराठा संघटनांनी जाहिर केली होती. मराठा आरक्षाच्या प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी मुंबई येथील या कार्यालयाला घेराव घातला होता.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा प्रवर्ग जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा घेतल्या जावू नये अशी मराठा क्रांती मोर्चाची मुख्य मागणी आहे. यापुर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून आपले म्हणणे मांडले होते.