पत्नीच्या अनैतीक संबंधाला वैतागला नारायण ; मित्रांच्या मदतीने केला खून, संपवले पारायण

आरोपी समवेत पोलिस पथक

नाशिक: उद्योजक नारायण चित्ते याने नाशिक शहरातील व्यावसायिक क्षेत्रात चांगला जम बसवला होता. यामाहा या दुचाकी वाहनांचे नाशिक शहरात त्याचे दोन शो रुम आहेत. पत्नी, एक मुलगा असा नारायणचा चौकोनी परिवार होता. बाहेरच्या व्यावसायीक झगमगाटात वावरणारा नारायण घरात मात्र दुखी: होता. घरगुती नाजुक कारण त्याच्या मनातल्या मनात सलत होते. त्याची पत्नी निता हिचे परपुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचे त्याला समजले होते. या एकच कारणामुळे नारायण चित्ते त्रासला होता. आपल्या घराची इज्जत झाकण्यासाठी नारायण याने पत्नी निता हिस वेळोवेळी समजावून सांगितले. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. पत्नी निता हिस चुकीचे वळ्ण लागले होते. ते वळण दुरुस्त होण्याचे नाव घेत नव्हते.

मयत नीता चित्ते

निता चित्ते चाळीशी गाठण्याच्या बेतात होती. नारायण व निता या दांपत्यास एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये असून ती शिक्षण घेत आहेत. या दांपत्याचा  मुलगा दहावीला तर मुलगी बारावीला आहे. घरात सर्व  प्रकारच्या सुख सोयी असतांना निता चित्ते हिस चुकीचे वळण लागले होते. त्यामुळे नारायण चित्ते मनातल्या मनात मोठ्या प्रमाणात वैतागला होता. घरातील इज्जत बाहेर जावू नये त्यासाठी नारायण चित्ते याने पत्नी निता हिस खुप समजावले. घरातील सुख शांतीसाठी त्याने शांत राहण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र त्याची शांत राहण्याची परिसिमा कधी कधी संपून जात होती. तो घरात पत्नी नितावर चिडचिड करत होता. कितीही समजावले तरी निताचे परपुरुषांसोबत असलेले संबंध संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून येत नव्हती. त्यामुळे या कटकटीला कायमचा रामराम देण्याचे त्याने मनाशी ठरवले.

नाशिक म्हसरुळ येथे त्याचा एक मित्र राहतो. विनय निंबाजी वाघ असे त्याचे नाव आहे. विनयच्या मदतीने नारायण याने पत्नी निता हिस या जगातून कायमचे संपवण्यासाठी तयारी सुरु केली. हे काम एकट्याकडून होणार नाही हे विनय वाघ याने ओळखले. विनय वाघ याचा उल्हासनगर येथे राहणारा एक मित्र आहे. भरत देवचंद मोरे असे त्याचे नाव आहे. या कटात विनय वाघ याने भरत मोरे यास सामिल करुन घेतले. नारायण चित्ते याच्या वतीने विनय वाघ याने भरत मोरे यास निता चित्ते हिस जिवे ठार करण्याची सुपारी दिली. या कामाचे भरत मोरे यास दहा लाख रुपये देण्याचे ठरले.

पर पुरुषांसोबत अनैतीक संबंध ठेवण्यात पारंगत झालेली निता चित्ते कुणाच्याही कॉलला प्रतिसाद देत असे. कॉलनुसार ती संबधिताला भेटण्यासाठी देखील जात असे. हाच धागा पकडून विनय वाघ याने भरत मोरे यास निताचा मोबाईल क्रमांक दिला. उल्हासनगर येथील रहिवासी भरत मोरे याने नितासोबत मोबाईलवर संपर्क सुरु केला. भरतने तिच्यासोबत मोबाईलवर प्राथमिक स्वरुपात चॅटींग सुरु केली. भरतच्या चॅटींगला निताने चांगला प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याने तिला कॉल करण्यास सुरुवात केली. कॉलवर दोघांचे बोलणे सुरु झाले व त्यातून दोघांची चांगली ओळख झाली. ठरल्यानुसार भरत मोरे याने तिच्यासोबत प्रेमाचे नाटक सुरु केले.

एके दिवशी तो तिला म्हणाला की आपण दोघे कुठेतरी बाहेर फिरायला जावू. त्याच्या या प्रस्तावाला ती लागलीच तयार झाली. उल्हासनगर येथून भरत मोरे याने तिला म्हटले की तु 14 जूनच्य रात्री नाशीक शहरातून जाणा-या महामार्गावर थांब. मी उल्हासनगर येथून तुला भेटायला चारचाकी वाहनातून येतो. तेथून आपण सोबत फिरायला जावू. अशा प्रकारे निता चित्ते हिस या जगातून संपवण्याचे नियोजन सुरु झाले. ठरल्यानुसार 14 जून रोजी ती माहेरी उत्तम नगर सिडको भागात जाण्याच्या बहाण्याने तयार झाली.

14 जून रोजी निता घरातून बाहेर पडली ती कायमचीच. रात्रीच्य वेळी महामार्गावरील उड्डाण पूल संपल्यानंतर के.के.वाघ महाविद्यालयाच्या समोर ती चालत चालत आली. काहीवेळातच लाल रंगाची स्विफ्ट कार ( एम एच 01 पीए 5632) तिच्यासमोर येवून थांबली. कार थांबताच ती भरतसोबत पटकन बसली. ती कार मधे बसताच भरतने पटकन गियर बदलत रेस करत आपल्या ताब्यातील वाहन वेगाने पळवले. भरत मोरे याने त्याच्यासोबत त्याचा साथीदार वाहिद अली शराफत अली याला आणले होते. तो देखील उल्हासनगर येथील रहिवासी होता. आपण तिघे जण सोबत मौजमजा करु असे भरत तिला म्हणाला. भरतच्या बोलण्यामुळे निता खुश झाली. मात्र पुढे काय संकट येणार आहे हे तिला ठाऊकच नव्हते.

भरत व वाहिद या दोघांनी तिला राहुड घाट परिसरात निर्जन ठिकाणी नेले. रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी दोघांनी मिळून तिच्याच साडीने तिचा गळा आवळून तिला जिवे ठार केले. काळ्या रंगाची साडी व काळे ब्लाऊज परिधान करुन नटून थटून मौजमजा करण्याच्या बहाण्याने आलेल्या निताचा करुण अंत झाला. रात्रीच्या अंधारात काळे कारनामे करतांना आपल्याला कुणी ओळखू नये यासाठी तिने काळी साडी परिधान केली होती. मात्र तिच्यासाठी ती काळरात्र ठरली. काळी साडी आणि काळरात्र यांचा संयोग एकप्रकारे जुळून आला.

तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दोघांनी तेथून पलायन केले. दुस-या दिवशी 15  जून रोजी भरत मोरे याने विनय वाघ याच्याकडून विल्होळी येथे पाच लाख रुपये घेतले. उर्वरीत रक्कम नंतर आणून दे असे म्हणत भरत याने त्याचा निरोप घेतला व दोघे पुन्हा उल्हासनगरला निघून गेले.

दोन दिवस निताचा मृतदेह निर्जन ठिकाणी बेवारस पडून होता. तिच्या मृतदेहाकडे कुणाचे लक्ष देखील गेले नाही. मात्र 16 जून रोजी तिच्या मृतदेहाची दुर्गंधी परिसरात पसरु लागली. चांदवड पोलिस स्टेशन हद्दीतील राहुड घाट परिसरात मुंबई आग्रा महामार्गावरील नाल्यात अज्ञात महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती चांदवड पोलिसांना समजली.

पोलिसांच्या दृष्टीने तिचा बेवारस मृतदेह अनोळखी होता. माहिती मिळताच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग, अप्पर पोलिस अधिक्षक (मालेगाव) संदिप घुगे, उप विभागीय अधिकारी (मनमाड विभाग) समीर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. के.के.पाटील यांनी तपासाची समांतर सुत्रे हाती घेतली. या प्रकरणी चांदवड पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.106/20 भा.द.वि. 302 व 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पो.नि.के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात मारेक-यांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु झाले. मयत महिलेच्या वर्णनानुसार नाशिक शहर व नजीकच्या जिल्हयातील बेपत्ता महिलांचा शोध सुरु करण्यात आला. या घटनेतील मयत महिलेच्या अंगावरील कपडे व घटनास्थळावरील वस्तूंशी मिळत्याजुळत्या वर्णनाची मिसींग अंबड पोलिस स्टेशनला दाखल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार मयत महिलेचे नाव निता  नारायण चित्ते (वय 39) असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला म्हसरुळ, नाशिक येथील असल्याची माहिती तपासात पुढे आली.

मयत निता चित्ते ही 14 जून रोजी सकाळी तिच्या माहेरी उत्तम नगर सिडको येथे जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडली होती. त्यादिवशी ती कुणाकुणाला भेटली याबाबत गुप्त पद्धतीने माहिती संकलीत करण्याचे काम सुरु करण्यात आले. 14 जून रोजी ती के.के.वाघ कॉलेजपासून एका लाल रंगाच्या स्विफ्ट कार मधे बसून गेल्याची माहीती खब-यांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तिचा पती नारायण शामभाऊ चित्ते यास चौकशीकामी बोलावण्यात आले. त्याची कसून  चौकशी करण्यात आली. सुरुवातीला आपल्याला काहीच माहिती नाही असा पाढा तो वाचत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने माहिती देण्यास सुरुवात केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याची पत्नी निता चित्ते ही परपुरुषांसोबत वारंवार अनैतीक संबंध ठेवत होती. तिच्या अशा वागण्यामुळे नारायण चित्ते हा वैतागून गेला होता. तिला त्याने वेळोवेळी समज देखील दिली होती. मात्र तिच्या वर्तनात फरक पडत नव्हता. त्यामुळे त्याच्या मनात पत्नी निता बद्दल अतिशय राग निर्माण झाला होता.

मयत निताचा पती नारायण याने म्हसरुळ येथील त्याचा मित्र विनय निंबाजी वाघ याच्या मदतीने उल्हासनगर येथील भरत देवचंद मोरे यास पत्नी निता हिस जिवे ठार मारण्याची सुपारी दिली होती. त्यामुळे विनय वाघ यास म्हसरुळ गंजपथ परिसरातून अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर येथून भरत देवचंद मोरे व त्याचा साथीदार वाहीद अली शराफत अली या दोघांना अटक करण्यात आली.

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. आरती सिंग, अप्पर पोलिस अधिक्षक संदिप घुगे, उप विभागीय पोलिस अधिकारी समीर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.के.के.पाटील यांनी आपले सहकारी स.पो.नि. स्वप्नील राजपूत, पो.उ.नि.मुकेश गुजर, सहायक फौजदार रविंद्र शिलावट, पो.हे.कॉ.संजय गोसावी, पोलिस नाईक हेमंत गिलबिले, पो.कॉ. सुशांत मरकड, पो.कॉ. मंगेश गोसावी,पो.कॉ. प्रदिप बहिरम यांच्या पथकाने या गुन्हयाचा तपास पुर्ण केला.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here