नाशिक : अशोक मोरे आणि नितीन टबाले हे दोघे बांधकामावर गवंडी काम करणारे कारागीर होते. दोघे एकाच क्षेत्रातील कारागीर असल्यामुळे दोघे एकमेकांना चांगल्याप्रकारे परिचीत होते. कधी कधी दोघांचे एकमेकांकडे जाणे येणे देखील होत असे.
एके दिवशी नितीन टबाले याची अशोक मोरेच्या पत्नीसोबत भेट झाली. अशोक मोरे याची पत्नी समोर दिसताच नितीन टबाले मनातून गर्भगळीत झाला होता. अशोक मोरे याची पत्नी दिसायला सुंदर होती. अशोकची पत्नी नितीन टबालेच्या मनात भरली होती.
अशोकची पत्नी देखील काही कमी नव्हती. तिने देखील चोर नजरेने नितीन टबाले कडे पाहिले होते. नितीनच्या मनात काय सुरु आहे याची तिला कल्पना आली होती. पुरुषांच्या मनाचा ठाव घेण्यात ती वाकबगर होती. तिला देखील मनातून नितीन टबाले आवडला होता. दोघांनी एकमेकांना आखो आखो मे इशारा केला. दोघांचा हा आखो आखो मे सुरु असलेला इशारा अशोकला समजण्यास खुप वेळ लागला. तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते.
अशोकच्या गैर हजेरीत त्याची पत्नी नितीन टबाले यास चोरुन लपून भेटू लागली. दोघांच्या प्रेमाचा सिलसिला कित्येक दिवस अव्याहतपणे सुरुच होता. अशोकच्या पत्नीला पती अशोकपेक्षा नितीन टबाले जवळचा वाटत होता. अशोक तिचा पती असला तरी तिने नितीन टबाले यास आपला पती मानले होते.
दोघे चोरुन लपून अशोकच्या गैर हजेरीत भेटून मौजमजा करत होते. एके दिवशी तिने प्रियकर नितीन टबाले यास विचारले की आपण किती दिवस असे चोरुन लपून भेटणार आहोत? उत्तरादाखल तिला नजरेने घायाळ करत तो म्हणाला की मी तुला पळवून नेतो. आपण दोघे पती पत्नीसमान राजा राणीसारखे राहू.
दोघांच्या मनाच्या व शरिराच्या तारा जुळल्या होत्या. त्यामुळे दोघांना बोलतांना व शारीरीक लगट करतांना काहीच वावगे वाटत नव्हते. एके दिवशी खरोखर नितीन टबाले याने अशोकच्या पत्नीला गुपचूप पळवून नेले. अशोक सोबत भरला संसार सोडून ती नितिन सोबत पत्नीसारखी राहू लागली.
आपल्या पत्नीला नितीन टबाले याने पळवून नेल्याचे समजल्यावर अशोक मनातून पार चिडला होता. आपली पत्नी नितिनसोबत पळून गेल्याचे शल्य अशोक यास सारखे बोचत होते. आपली पत्नी आज परत येईल, उद्या परत येईल अशी खुळी आशा अशोक मनाशी बाळगून होता. मात्र त्याच्या पत्नीला त्याचे काहीच सोयरसुतक नव्हते. ती नितीनसोबत मजेत रहात होती. तिला पती अशोकची आठवण देखील येत नव्हती. जवळपास दोन महिने उलटून गेले तरी देखील अशोकची पत्नी घरी परत आलीच नाही. नितीन टबाले तिचे सर्व लाड आणि शोक पुर्ण करत होता. तिला नितीनच प्रिय होता.
दरम्यान 8 ऑक्टोबर रोजी अशोक आणि नितीन अचानक अमोरासमोर आले. नितिन समोर दिसताच अशोकच्या संतापाचा पारा एकदम वर चढला. अशोकने नितीनवर थेट हल्ला चढवला. जवळ असलेल्या हुकाच्या सहाय्याने त्याने नितीनच्या शरीरावर ठिकठिकाणी वार करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी, बुटाने त्याच्या डोक्यावर, तोंडावर, छातीवर आणि शरीरावर जसे जमेल व तसे मारण्यास सुरुवात केली. नितीन जखमी झाल्यानंतर त्याचा गळा दाबून त्याला अशोकने कायमचे संपवले. या मारहाणीत नितीन टबाले जागीच मृत्यूमुखी पडला.
नितीन कायमचा संपल्याचे लक्षात आल्यानंतर अशोकने त्याचा मृतदेह सावरगाव शिवारात टाकून देत पलायन केले. दुस-या दिवशी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी सदर घटना उघडकीस आली.
सावरगाव शिवारातील पाटबंधारे कार्यालय परिसरात मयत नितीन टबाले याचा मृतदेह पडलेला होता. य घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, उप विभागीय अधिकारी भिमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक एस.एस.सपकाळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.के.के.पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली.
या प्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. तपासाअंती खूनाचा प्रकार निष्पन्न झाल्यानंतर सरकारतर्फे फिर्यादी होत स.पो.नि.भटू पाटील यांनी फिर्याद दाखल केली. सदर गुन्हा नाशिक तालुका पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 67/20 भा.द.वि.302 अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला.
मयताची ओळख पटली होती. मयत नितीन टबाले असल्याचे निष्पन्न झाले होते. घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. के.के.पाटील तसेच नाशिक तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. एस.एस.सपकाळे यांना योग्य ते मार्गदर्शन केले.
सदर गुन्ह्याचा तपास सुरु असतांना नाशिक तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी विक्रम कडाळे यांना गुप्त बातमीदाराकडून एक माहिती समजली. मयतासोबत रहात असलेली विवाहीत महिला ही त्याची पत्नी नसून अशोक मोरे याची पत्नी आहे. मयताचे तिच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची अधिक माहिती कर्मचारी विक्रम कडाळ यांना समजली. अशोक मोरे याची पत्नी मयत नितीन टबाले याच्यासोबत रहात असल्याचे अधिक चौकशीत समजले. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपासावर भर देण्यात आला.
मयतासोबत राहणा-या महिलेच्या पतीनेच अर्थात अशोक मोरे यानेचे हा खून केला असल्याची गोपनीय माहिती तपासात पुढे आली. त्यानुसार अशोक मोरे (आभाळवाडी गंगापुर धरण उजवा कॅनल जवळ, महादेवपुर शिवार ता.जि.नाशिक) यास नाशिक तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्गाने मिळून शोध घेवून ताब्यात घेतले.
सुरवातीला अशोक मोरे याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसी खाक्य्या दिसताच त्याने आपला गुन्हा कबुल केला. मयत नितीन टबाले याने अशोक मोरे याच्या पत्नीला गेल्या दोन महिन्यापासून पळवून नेले होते. या गोष्टीचा अशोक यास राग होता.
घटनेच्या दिवशी दोघे अमोरासमोर येताच अशोकच्या मनातील राग उफाळून आला. संतापाच्या भरात अशोकने नितीन यास बेदम मारहाण करत गळा दाबून त्याला जिवे ठार केले. अशा प्रकारे गुन्हा कबुल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, पो.नि. एस.एस. सपकाळे, स.पो.नि. वाघ, पाटील, ठाकरे, आथरे पो.ना. हांडगे, खराटे, भावनाथ, ढिकले पो.शि. कडाळे, प्रदीप बहिरम यांनी तपास पुर्ण केला.