डेटींगसाठी मुली मागवणे जेष्ठ नागरिकाला पडले महागात

पुणे : पुणे येथील एका जेष्ठ नागरिकाला डेट साठी मुली मागवणे महागात पडले. सायबर चोरांनी या जेष्ठाला आपल्या जाळ्यात ओढून सुमारे पावणेचार लाख रुपयांचा गंडा घातला.

क्वार्टर गेट येथे राहणाऱ्या ६८ वर्ष वयाच्या सिनीयर सिटीझनने याबाबत सायबर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. गेल्या 13 जुलै पासून हा प्रकार सुरु होता.

फिर्यादी जेष्ठ नागरिकास आलेल्या फोनवर पलीकडून बोलणा-याने त्यांना डेटींगसाठी मुली पुरवण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी एका साईटवर त्यांना रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात आले होते.

याकामी त्या जेष्ठ नागरिकास एका बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी सांगण्यात आले़ होते. त्यानुसार जेष्ठ नागरिकाने पैसे जमा केले. त्यानंतर दुस-या मोबाईल क्रमांकावरुन त्यांना पुन्हा एक फोन आला. त्या फोनवरुन त्यांना सांगण्यात आले की तुम्ही रजिस्ट्रेशन केले आहे. त्यामुळे आता पोलिस तुम्हाला पकडतील. हे रजिस्ट्रेशन रद्द करायचे असेल तर अजून पैसे खात्यावर जमा करावे लागतील.

अशा प्रकारे धाक दाखवून जेष्ठ नागरिकाकडून ३ लाख ७४ हजार रुपये बँक खात्यावर जमा करण्यास भाग पाडले. जेव्हा वारंवार पैशांची मागणी होवू लागली तेव्हा या बाबांनी सरळ सायबर पोलिस स्टेशन गाठले.

प्राथमिक तपासानंतर सायबर पोलिसांनी हा गुन्हा समर्थ पोलिस स्टेशनकडे वर्ग केला असून पुढील तपास सुरु आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here