मुंबई पोलीस ग्रेट – 1500 कि.मी. पाठलाग करुन पकडला आरोपी

मुंबई : मुंबई पोलीस दल हे जगभरात नावाजलेले आहे. मुंबई पोलिसांची तपासाची पद्धत आणि हातोटी प्रसिद्ध असल्याचे एका घटनेवरुन पुन्हा एकवेळा अधोरेखित झाली आहे.

मुंबईच्या एका व्यापाऱ्याकडून 16 लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या खंडणीबहाद्दरास मुंबई पोलीस दलाच्या खंडणी विरोधी पथकाने नुकतीच अटक केली आहे. यात महत्वाची बाब म्हणजे, खंडणी विरोधी पथकाने या आरोपीचा माग काढत तब्बल 1500 कि.मी. प्रवास केला. ताब्यात घेतलेला आरोपी तोतया आयपीएस अधिकारी निघाला.
अटकेतील बनावट आयपीएस अधिकाऱ्याचे नाव श्यामसुंदर सत्यनारायण शर्मा उर्फ एस.एस.शर्मा आहे.

श्याम शर्मा या आरोपीने एका गुजराती व्यावसायीकाला मुंबईतील चर्चगेट परिसरातील फाईव्ह स्टार हॉटेलात बोलावले होते. आपण आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी श्याम शर्मा याने त्या व्यावसायीकाजवळ केली होती.

हा व्यापारी ज्यावेळी मुंबईतील अ‍ॅम्बेसडर हॉटेलमध्ये पोहोचला त्यावेळी श्याम शर्माचा खरा चेहरा समोर आला. श्याम शर्मा याने या व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केली होती. त्यानंतर त्याच्याच गाडीत त्याला बसवून त्याचे अपहरण केले.

श्याम शर्मा रहात असलेल्या सुरत येथील घरात त्याला डांबून ठेवण्यात आले. व्यावसायीकाच्या घरी फोन करुन 16 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. तजवीज केल्यानंतर व्यावसायीकाने त्याला 16 लाख रुपयांची रक्कम खंडणी स्वरुपात दिली.

रक्कम मिळाल्यानंतर श्याम शर्मा त्या व्यावसायीकाला सोडून पसार झाला. शर्माच्या तावडीतून मुक्त झालेल्या व्यावसायीकाने सुरत पोलिसांना भेटून आपबीती कथन केली. सुरत येथील पोलिसांनी मुंबई पोलिसांना या घटनेची माहिती दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे आला.

पोलिस पथकाने हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपीचा चेहरा अस्प्ष्ट दिसून येत होता. त्याचे रेखाचित्र काढून शोध घेण्यात आला. श्याम शर्मा याचे मोबाईल लोकेशन तपासले असता तो बडोदा येथे असल्याचे आढळून आले. पोलिस पथक बडोदा येथे जात नाही तोवर तो सुरत येथे गेला होता. पथक सुरत येथे गेल्यानंतर तो मुंबईत आला होता. त्यामुळे मुंबई पोलिस पुन्हा मुंबई येथे आले.

आता आरोपीने आपला मोबाईल बंद करुन ठेवला होता. त्यामुळे त्याचा पाठलाग करणे कठीण झाले होते. तरीदेखील मुंबई पोलिसांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. त्याचा पाठलाग करत पोलिस पथक कर्नाटकातील हुबळी येथे पोहोचले. आरोपी श्याम शर्मा वारंवार त्याचे ठिकाण बदलत होता.

त्याचा अंदाज घेत हुबळी येथे पोहोचण्यापुर्वी मुंबई पोलिसांनी कर्नाटक पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार कर्नाटक पोलिसांनी हुबळी येथे नाकाबंदी लावली. नाकाबंदी दरम्यान एका खासगी बसची तपासणी केली असता श्याम शर्मा पोलिसांच्या तावडीत सापडला.

श्याम शर्मा याची सखोल चौकशी केली असता मध्यप्रदेश पोलीस असल्याचे भासवून त्याने अनेकांना गंडवले होते .त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. त्याचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि राहणीमान एखाद्या आयपीएस अधिका-यासमान होते. त्याने खाकी युनीफॉर्म शिवून घेतला होता. त्याअर स्टार देखील लावून घेतले होते. त्यामुळे लोकांना त्याच्यावर संशय येत नव्हता. मात्र तोतया आयपीएस अधिका-याच्या रुपातील भामट्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here