पिंपरी: भांडणातून मारहाण झाल्यामुळे निर्माण झालेला राग मनात धरुन तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. खून केल्यानंत्र त्याच मृतदेह जाळून त्याची राख नदीत टाकून पुरावा नष्ट करण्यात आला होता. सदर घटना घडल्यानंतर तिन महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला. पिंपरी येथे हा खळबळजनक प्रकार घडला होता. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत अटक केली आहे.
जसबीरसिंग ऊर्फ बिल्लू ऊर्फ विक्की गुलजारसिंग विरदी (वय १९, रा. मिलिंदनगर, पिंपरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. निरज अशोक जांगयानी (वय २६, मेन बजार, पिंपरी), ललीत लालचंद ठाकूर (वय २१, रा. वैष्णोदेवी मंदिरामागे, पिंपरी), योगेश केशव पंजवाणी (वय ३१, रा. संजय लायब्ररी लेन, गुरुव्दाराजवळ, पिंपरी) आणि हरजोतसिंग रणजितसिंग लोहीट (वय २२, रा. वैष्णोदेवी मंदिराजवळ, पिंपरी) अशी संशयीत आरोपीतांची नावे समोर आली आहेत. या सर्व संशयीतांच्या विरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसबीरसिंग विरदी आणि त्याचा भाऊ सनी गुलजारसिंग विरदी या दोघांनी आरोपी निरज जांगयानी यास मारहाण केली होती. दि. ७ मार्च २०२० रोजी हा खळबळजनक प्रकार घडला होता. याप्रकरणी निरज जांगयानी याने त्याच दिवशी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलिसांकडे तक्रार केली होती . त्यानंतर निरज जांगयानी आणि इतर आरोपी पिंपरी येथील डेअरी फार्म रोड येथील गोठ्यामध्ये मद्य प्राशन करत बसले होते. दरम्यान आरोपी हरजोतसिंग लोहीट हा रात्री बारा वाजेच्या सुमारास जसबीरसिंग विरदी याला घेण्यासाठी पिंपरी येथील रिव्हर रोड येथे आला. तेथून आरोपी हरजोतसिंग हा जसबिरसिंग विरदी याला घेऊन डेअरी फार्म रोड येथील गोठ्यात रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पोहचला. तेथे मद्य प्राशन करत असलेला आरोपी निरज जांगयानी व इतर आरोपी यांनी जसबीरसिंग याचा गळा दाबून व त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला होता. त्यानंतर गोठ्यातील चारा, कचपान, वाळलेली काटके तसेच वाळलेले शेण इत्यादी टाकून त्याचा मृतदेह जाळून टाकण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर त्याची राख दापोडी येथील पुलावरून नदीपात्रात टाकून पुरावा नष्ट करण्यात आला होता.
दरम्यान, जसबीरसिंग विरदी हा दि. ७ मार्च रोजी घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर तो घरी आलाच नव्हता. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची मिसींग त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे दाखल केली होती. त्यानुसार पोलीसांकडून त्याचे शोधकार्य सुरु होते. तपासाअंती त्याचा खून झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी सखोल तपास केला असता आरोपितांनी त्याचा खून केल्याचे उघड झाले. पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.