जळगाव : जळगाव तालुक्यातील वावडदा या गावी एल.एच.पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलबाबत वावडदा येथील संतप्त पालकांनी जिल्हाधिका-यांना एक निवेदन दिले आहे. या शाळेतील प्रवेश प्रक्रियेच्या चौकशीची मागणी स्थानिक पालकांनी जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
वावडदा ता.जळगाव येथील एल.एच.पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल ही शैक्षणीक संस्था वावडदा या गावापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर आहे. आरटीई नियमानुसार या शाळेत स्थानिक रहिवासी असलेल्या नागरिकांच्या मुलांना 25 टक्के प्रवेश देणे बंधनकारक आहे.
असे असले तरी देखील या गावातील बरेच स्थानिक विद्यार्थी सन २०२०-२१ या शैक्षणीक वर्षासाठी शाळा प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. तसेच कित्येक विद्यार्थी प्रतिक्षा यादीवर ताटकळत आहेत. या प्रकरणी हवालदिल झालेल्या पालकांनी नुकतीच जिल्हाधिका-यांची भेट घेवून आपली व्यथा निवेदनाच्या माध्यमातून मांडली आहे.
शाळा परिसरातील स्थानिक रहिवासी, आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळावे, त्यांना शिक्षणाचा मुलभुत अधिकार मिळावा यासाठी शाळांमध्ये काही प्रवेश राखीव ठेवण्याची आरटीई कायद्यात आहे
मात्र वावडदा येथील रहिवासी नसतांना देखील काही पालकांनी ते वावडदा येथील रहिवासी असल्याचे खोटे पुरावे सादर करत प्रवेश मिळवला असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी पालकांनी केला आहे. त्यामुळे गावातील स्थानिक रहिवासी असलेल्या पालकांवर व पर्यायाने त्यांच्या पाल्यांवर अन्याय झाला असल्याची ओरड मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्या स्थानिक रहिवासी पाल्यांना शाळेत प्रवेश मिळावा एवढी माफक अपेक्षा पालक बाळगुन आहेत.
न्याय हक्कासाठी या पालकांनी राज्य शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे लेखी तक्रार सुद्धा दाखल केली होती. शिक्षक संचालकांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेत जळगाव शिक्षण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या प्रकरणाची अद्यापही चौकशी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तात्काळ विनाविलंब चौकशी होण्याची मागणी स्थानिक रहिवासी पालकांनी केली आहे.