मुंबई : राज्य सरकारने “एमपीएससी” ची ११ ऑक्टोबर रोजी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा अजून लांबणीवर टाकली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही परिक्षा अजून पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन सरकारने तात्पुरता प्रश्न सोडवला आहे. मात्र, आता त्यासोबतच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अजून दोन परीक्षा रद्द करण्यात आल्याचे एमपीएससीकडून जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
एमपीएससीच्या परीक्षा एकाएकी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. नवीन वर्षांच्या शैक्षणिक प्रवेशाबाबत सरकारने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सेवेची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर ११ ऑक्टोबरची राज्य सेवा परीक्षेचे काय होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात होते. दरम्यान ही परीक्षा रद्द करण्यात आली. आता १ नोव्हेंबरला होणारी अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा व २२ नोव्हेंबरला दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा रद्द झाल्याचे जाहीर झाले आहे.
४ लाख ४० हजार विद्यार्थी या दोन्ही परीक्षेला बसणार आहेत. वेळापत्रकानुसार या परीक्षा पार पाडण्यासाठी लागणारी सर्व प्रशासकीय तयारी शिगेला पोहोचली होती. दरम्यान अचानक एमपीएससीकडून या परीक्षा रद्द झाल्या.