बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट सही करत आपण त्यांचे खासगी सचिव असल्याचे भासवत फसवणुक करणा-यास बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्या या घटनेने खळबळ माजली आहे.
अजय कामदार (६४) रा.मुंबई हे या प्रकरणी फिर्यादी असून तुषार तावरे (रा.तारांगण सोसायटी, बारामती, जि.पुणे) हा संशयीत आरोपी आहे. तुषार तावरे याने दि १४ ऑक्टोबर रोजी कामदार यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता.
”मी उपमुख्यमंत्री कार्यालयातुन बोलत असून अजितदादा पवार यांच्याकडे आपल्याविरुध्द तक्रार आली असल्याचे त्याने कामदार यांना फोनवर सांगितले होते. सदर तक्रार तुम्हास व्हॉटस अॅपवर पाठवली असून ती बघा असे तुषार तावरे याने अजय कामदार यांना सांगितले होते.
अजय कामदार यांनी ती तक्रार व्हाटस अॅपवर तपासून पाहिली. व्यवसायाने बिल्डर असलेल्या अजय कामदार यांच्या व्यवसायाच्याशी संबंधीत तक्रारी अर्जावर उपमुख्यमंत्र्यांचा “तात्काळ कारवाई करावी”, असा शेरा होता.
तुषार कामदार यांनी तात्काळ तावरे यांचेशी संपर्क साधत माहिती जाणून घेतली. त्यावर तावरे यांनी कामदार यांना म्हटले की तुमच्याविरुध्द असलेला अर्ज मी कमिशनरकडे पाठवलेला नाही. तुमचे व अर्जदाराचे वाद लवकरात लवकर तीन दिवसात मिटवुन घ्यावा अन्यथा कडक कारवाई केली जाईल.
असे असले तरी कामदार यांना शंका आली. त्यांनी उप मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत शहानिशा केली. त्यावेळी तुषार तावरे या नावाचा कुणीही आपल्या कार्यालयात नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेत पुढील कायदेशीर कारवाई केली.