दहशत निर्माण करणा-या हद्दपार आरोपीस शिक्षा

जळगाव : हद्दपारी दरम्यान शहरात दहशत निर्माण करणा-या आरोपीस आज सहा महिने साधी कैद व दोन हजार रुपयांचा दंड, दंड न  भरल्यास 15 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की किरण शंकर खर्चे (27) रा. सुप्रिम कॉलनी जळगाव यास उप विभागीय अधिकारी जळगाव यांनी दोन वर्षासाठी हद्दपार केले होते. तथापी हद्दपारी दरम्यान 15 ऑगस्ट 2018 रोजी किरण शंकर खर्चे हा सुप्रिम कॉलनी परिसरातील मच्छी बाजारात तलवारीच्या बळावर दहशत निर्माण करत होता. त्याला एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलिस कर्मचारी भरत जेठवे, किशोर पाटील, सतिष गर्जे, यांनी सापळा रचून शिताफीने अटक केली होती.

या प्रकरणी पो.कॉ. सतिष गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसात गु.र.न. 140/18 मु.पो.अ‍ॅक्ट 142    (4) (डब्ल्यु), 37, (1), (3) चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 135 व आर्म अ‍ॅक्ट 4/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास सहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांनी पुर्ण केला. श्री श्रीनाथ फाड, मुख्य न्यायदंडाधिकारी जळगाव यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. या खटल्यात सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता निखील कुलकर्णी व पैरवी अधिकारी हे.कॉ. शंकर सपकाळे यांनी काम पाहिले. सदर खटल्यात फिर्यादी पो.कॉ. सतिष गर्जे, तपासी अंमलदार सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. आरोपी शंकर खर्चे य आस सहा महिने साधी कैद व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास 15 दिवसांची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली.