औरंगाबाद : गुटखा विक्री प्रकरणी तक्रारदार व्यापाऱ्याला सहआरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेणे औरंगाबाद सिटी पोलिस स्टेशनला कार्यरत पोलिस उप निरिक्षकास महागात पडले.
संतोष रामदास पाटे असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस उप निरिक्षकांचे नाव असून बुधवारी मध्यरात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. काही दिवसांपूर्वी पोलीस व अन्न व औषधी प्रशासन विभागाने तक्रारदाराच्या दुकानावर छापा टाकला होता. या छाप्यात सुगंधी तंबाखू व प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी सिटी चौक पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पीएसआय संतोष पाटे यांच्याकडे होता.
तक्रारदारास सह – आरोपी न करण्यासाठी पीएसआय पाटे यांनी त्यांच्याकडे पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार , उपाधीक्षक ब्रह्मदेव गावडे यांच्या निदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप राजपूत व त्यांच्या सह्कारी कर्मचाऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री लाचेच्या मागणीची पडताळणी केली.
आरोपी फौजदार संतोष पाटे यांनी ५० हजार रुपयांची पंचासमक्ष मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी फौजदार पाटे यास पकडण्यासाठी सापळा रचला. सिटी चौक परिसरात तक्रारदाराकडून पन्नास हजार रुपयांची लाच घेताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी फौजदार पाटे यास लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले. या कारवाईने औरंगाबाद शहर पोलिस दलात खळबळ माजली.