धुळे : धुळे शहरातील अॅक्सिस बँकेत धुळे विकास बँकेचे खाते आहे. हे खाते ८ जून २०२० रोजी हॅकर्स कडून हॅक करण्यात आले होते. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या १८ बँकेतील २७ खात्यांमध्ये २ कोटी ६ लाख ५० हजार १६५ रुपयांची रक्कम हॅंकर्सच्या माध्यमातून परस्पर ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यात आली होती.
या प्रकरणी धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आरोपी अटकेसाठी दोन पथके तयार केली होती.
या तपासात त्यांनी पथकाच्या मदतीने दिल्ली येथून एका नायझेरियन व्यक्तीसह पाच जणांना ताब्यात घेतले. ताब्यातील टोळीत एक महिला आहे़. या टोळीकडून ५ लाख ९८ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात पोलिस पथकाला यश आले आहे.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी पत्रकार परिषदेत याविषयी अधिक माहिती दिली आहे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह अन्य अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते़.