नाशिक : दोन वर्षापुर्वी पोलिसांच्या तावडीतून भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन फरार झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे.
येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या 19 ऑक्टोबर घरफोडी व चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी येवला तालुका पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल झाला होता.
वरिष्ठांच्या मार्गर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. भिसे व स.पो.नि. राजपूत यांच्यामार्फत सुरु होता. त्यांनी वेगवेगळी पथके तयार करून पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती काढण्यास सुरुवात केली होती.
तपास व चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार येवला वैजापूर सीमेवरील औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बिल्वानी या गावातील परिसरात एक इसम संशयास्पद स्थितीत वावरत होता. या माहितीच्या आधारे संशयीत इसमास ताब्यात घेवून त्याच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. घर झडती दरम्यान त्याच्या घरातून कटावणी, टॉमी, पक्कड, स्क्रू ड्राइवर, तीन टॉर्च लाइट, एक चॉपर, एक चाकू असे घरफोडीचे साहित्य मिळून आले. ते सर्व सामान हस्तगत करण्यात आले.
ताब्यातील इसमाच्या नावाची विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव शिवा जनार्धन काळे (मौजे बिल्वानी ता वैजापूर जिल्हा औरंगाबाद) असे सांगितले. त्याला अटक करण्यात आली.
अटकेतील शिवा काळे याने सन 2012 मध्ये दिवे आगार गणेश मंदिरात दरोडा टाकून दोन सुरक्षा रक्षकांचा खून तसेच गणेश मूर्ती चोरी केली होती. त्यावेळी ते प्रकरण गाजले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी सतिष काळे याला मोक्का न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा झाली होती. सन 2018 मधे आरोपीस रेल्वेने नागपूरला घेवून जात असतांना तो भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन पोलिसांच्या तावडीतून फरार झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत तो फरार होता. त्याच्यावर घरफोडी, जबरी चोरी, दरोडा व खुनासह दरोडा असे विविध गुन्हे दाखल असून तो नाव बदलून रहात होता. अनेक जिल्ह्यात तो वान्टेड होता.
नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलिस स्टेशनचे स.पो.नि. भिसे, स.पो.नि.राजपूत व त्यांचे सहकारी पोलिस हवालदार सानप, पो.कॉ.मोरे व पथकाच्या मदतीने या आरोपीचा शोध लागला.