नाशिक : नानी दमण या केंद्रशासित प्रदेशातील बिजेपीचे नगरसेवक सलीम अन्वर बारबटीया उर्फ सलीम मेमन यांचा गेल्या आठ महिन्यांपुर्वी गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तसेच मुंबईच्या छोटा राजन टोळीचा हस्तक जयराम श्रावण लोंढे (गांधीधाम, देवळाली गाव) हा नाशिक पोलिसांच्या तावडीत सापडला. नाशिकच्या गुन्हे शाखा युनीट-२ च्या पथकाने त्याला त्याच्या घरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेत अटक केली आहे.
नानी दमण येथील समुद्राच्या किनारी असलेला एक भुखंड रिकामा करण्याची सुपारी छोटा राजन टोळीला मिळाली होती. या टोळीतील जयराम लोंढे यास तो प्लॉट रिकामा करण्याकामी तेथील दुचाकी शोरुमचे मालक सलीम बारबटीया यांच्या हत्येचे काम सोपावण्यात आले होते.
जयराम याने कल्याण येथील काही सराईत गुंडांच्य मदतीने गेल्या आठ महिन्यांपुर्वी शोरुममध्ये बेकायदा प्रवेश करत गोळीबार करत बारबटिया यांची हत्या केली होती. तेव्हापासून जयराम फरार झाला होता. तो काही महिन्यांपुर्वी नाशिकला येवून गेला असला तरी पोलिसांना त्याचा सुगावा लागला नव्हता. तो चेन्नई येथे पळून गेला होता. दसरा सणाच्या निमीत्ताने तो नाशिक येथे आल्याची गुप्त माहिती मिळताच नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट – 2 च्या पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला अटक केली.