मुंबई : काही दिवसांपुर्वी काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका परिसरात एका महिलेने वाहतुक शाखेच्या पोलिस कर्मचा-यावर शिव्या दिल्याचा आरोप केला होता. तसेच त्या महिलेने त्या पोलिस कर्मचा-याच्या कानशिलात लगावून मारहाण देखील केली होती.
या घटनेप्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी त्या महिलेस बेड्या ठोकल्या आहेत. सादविका रमाकांत तिवारी (30) मशीद बंदर तसेच मोहसीन निजामउददीन खान (26) भेंडी बाजार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक जागी वर्दीचा अनादर झाला असला तरी संयम ठेवत महिलांचा आदर राखल्याप्रकरणी त्या ट्रॅफिक पोलिस कर्मचा-याचा ए.सी.पी. लता धोंडे यांनी भररस्त्यात गाडी उभी करुन सन्मान केला.
ज्या रस्त्यावर वाहतुक पोलिस कर्मचारी एकनाथ पार्टे यांचा पर्यायाने वर्दीचा अवमान झाला त्याच रस्त्यावर महिलेचा आदर राखत संयम राखल्याप्रकरणी हा सन्मान केला जात असल्याचे ए.सी.पी. धोंडे यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी करुन आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त धोंडे यांनी म्हटले आहे. लता धोंडे सध्या कुलाबा, कफ परेड व मरीन ड्राईव्ह विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त असून त्यांनी यापूर्वी वाहतूक विभागात देखील सेवा बजावली आहे.
२३ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास काळबादेवी वाहतूक विभागात कार्यरत असलेले हवालदार एकनाथ पार्टे कॉटन एक्सचेंज चौकात ड्युटीवर होते. त्यावेळी एक मोटार सायकलस्वार विना हेल्मेट आढळून आल्यामुळे त्यांना रोखण्यात आले होते. त्यावेळी हुज्जतबाजीतून हा प्रकार घडला होता. यातील दोघा जणांना अटक करण्यात आली आहे.