जळगाव : रात्रीच्या वेळी शतपावली करणा-या दांम्पत्याच्या ताब्यातील व मालकीचा महागडा मोबाईल हिसकावून पळून जाणा-या दोघा अल्पवयीन मोबाईल चोरांना शनीपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर गुन्हा जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की 29 ऑक्टोबरच्या रात्री 10.30 वाजेच्या सुमारास नागेश खेडगी व त्यांची पत्नी असे दोघे जण गणेश कॉलनी परिसरातील महावीर क्लासेसच्या रस्त्याने शतपावली करत होते. त्यावेळी नागेश खेडगी हे त्यांच्या पत्नीचा मोबाईल हाताळत असतांना मागून भरधाव वेगाने दोघे अल्पवयीन दुचाकीचालक आले. त्यांनी भरधाव वेगात काही कळण्याच्या आत खेडगी यांच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून पलायन केले. दोघे अल्पवयीन दुचाकी चालक भरधाव वेगात असल्यामुळे त्यांच्या ताब्यातील दुचाकीचा क्रमांक खेडगी यांना टिपता आला नाही.
दुस-या दिवशी 30 ऑक्टोबर रोजी त्यांनी या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला या प्रकरणी रितसर तक्रार दाखल केली. पोलिस उप अधिक्षकांच्या आदेशाने या गुन्ह्याचा तपास शनीपेठ पोलिस पथकाला देण्यात आला. या पथकात सहायक फौजदार सलीम पिंजारी, पो.हे.कॉ. दिनेशसिंग पाटील, पोलिस नाईक अभिजीत सैंदाणे, राहुल पाटील, राहुल घेटे, रविंद्र पाटील यांचा समावेश करण्यात आला.
या पथकातील माहितगार आणी वाकबगार पो.हे.कॉ. दिनेशसिंग पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील दोघा अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळाले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी तपासकामी जप्त करण्यात आली आहे.