नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील तसेच मालेगाव कॅंम्प डीवायएसपी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव छावणी, पेठ आणि पवारवाडी पोलिसांनी आज धडक कारवाई केली. या कारवाईत मालेगाव छावणी व पेठ पोलिस स्टेशनच्या पथकाने दुचाकी व चारचाकी चोरट्यांना मुद्देमालासह अटक केली आहे. पवारवाडी पोलिसांच्या पथकाने गावठी पिस्टल, जिवंत राऊंड या मुद्देमालासह आरोपीस अटक केली आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव छावणी पोलिस स्टेशनचे पो.नि.प्रविण वाडीले व त्यांच्या पथकाने मालेगाव शहरातील सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश संजय कोळी (२३) ओमकार कॉलनी, अयोध्यानगर, सोयगाव ता. मालेगाव तसेच अमजद फकीरा शेख (२४) देवीचा मळा, जिया शेठच्या बंगल्यासमोर मालेगाव या दोघांना शिताफीने ताब्यात घेत अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून चौकशीअंती दोन स्प्लेंडर, दोन होंडा शाईन, तिन एच डिलक्स, एक बजाज डिस्कव्हर, तिन बजाज प्लॅटिना, एक होंडा कंपनीची ड्रीम युगा अशा एकुण बारा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. हा मुद्देमाल २,९५,000 किंमतीचा आहे. मालेगाव छावणी पोलिस स्टेशनचे पो.नि. प्रविण वाडीले यांच्या अधिपत्याखाली पो.उ.नि. आर.के.घुगे, पोलिस नाईक वाघ, पो.कॉ. बारहाते, राठोड, नेरपगार, पाटील यांनी ही कारवाई पुर्ण केली.
दुस-या कारवाईत पोलिस अधिक्षक सचिन पाटील व अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलीस स्टेशनचे पो.नि. रामेश्वर गाडे पाटील यांच्यासह त्याच्या पथकातील सहायक फौजदार जाडर, पोलिस हवालदार शेखरे, पोलिस नाईक शेख, पो.ना. भुसनर, पो.कॉ. भोये यांनी कारवाई केली.
या कारवाईत रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरज जोंधळे, सादरपाडा ता. पेठ व त्याचे दोघे साथीदार प्रतिक मातेरे, व अनिल धुळे (धारणगाव ता. कोपरगाव) या तिघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून पेठ पोलीस स्टेशन हद्दीत त्यांनी चोरी केलेल्या दोन पिक-अप तसेच एमआयडीसी सिन्नर पोलीस स्टेशन हद्दीतुन चोरी केलेली एक पिक-अप, एक ओमनी व्हॅन व दोन मोटार सायकल तसेच गुन्हा करतांना वापरलेली बोलेरो यासह गाडी तसेच चोरून नेलेली साळ व रुपये ३१०० रोख असा ८,०२,३०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. या माध्यमातून पेठ पोलिस दोन व एमआयडीसी सिन्नर पोलिस स्टेशनचे चार असे एकुण सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
तिस-या कारवाईत पवारवाडी पोलीस स्टेशनचे पो.नि. गुलाबराव पाटील यांच्या पथकातील पोलिस हवालदार धारणकर, पोलिस हवालदार बाविस्कर, पो.कॉ. ढामसे, पो.कॉ. भामरे, पो.कॉ. शेलार यांच्या पथकाने पेट्रोलींग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेकॉर्डवरील हद्दपार गुन्हेगार इब्राहिम अहमद अब्दुल गनीम उर्फ दुरी, नुरनगर रमजानपुरा मालेगाव यास बेकायदेशीर गावठी कट्ट्यासह ताब्यात घेण्यात आले. त्याला अटक करण्यात आली.