दारुच्या नादात भुषण डेअरींग करायचा फार ! तिघा मित्रांनी चाकूच्या घावात केले त्याला गार !!

जळगाव : अतूल ज्ञानेश्वर काटकर, प्रतिक निंबाळकर, दुर्गेश आत्माराम सन्यासी आणि भुषण भरत सोनवणे हे चौघे गुन्हेगारी वृत्तीचे तरुण एकमेकांचे मित्र होते. चौघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. दुर्गेश सन्यासी याने काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावर रस्तालुट केली होती. या रस्तालुटीच्या गुन्ह्यात दुर्गेशने एका ट्रक चालकाकडून पैसे हिसकावले होते. या गुन्ह्यात अटकेनंतर तो जामीनावर बाहेर आला. प्राणघातक हल्ला करण्यासह जबरी लुटीचे गुन्हे या चौघा तरुणांवर दाखल आहेत. चौघे तरुण गुन्हेगारी वृत्तीचे असल्यामुळे साहजिकच त्यांना दारु पिण्याचे व्यसन होते.

भुषण सोनवणे यास दारुचे भारी व्यसन होते. दारुचे व्यसन पुर्ण करण्यासाठी तो वेळप्रसंगी इतर तिघा मित्रांकडून बळजबरी पैशांची मागणी करत असे. वेळप्रसंगी तो मित्रांच्या खिशातून बळजबरी पैसे काढून घेत असे. त्याच्या या प्रकाराचा अतुल, प्रतिक व दुर्गेश या तिघा मित्रांना राग येत असे. त्यातून त्यांच्यात बाचाबाची होत असे. चौघे जण दारु पिण्यास बसले म्हणजे त्यांच्यात हमखास एखाद्या मुद्द्यावर वाद होत असे. या वादात भुषण एका बाजूला व तिघे दुस-या बाजुला असे दोन गट पडत असत. दोन्ही गट एकमेकांना शिवीगाळ करत असत. भुषण सोनवणे याच्या गुन्हेगारी कारवाया पोलिस प्रशासनाने हेरल्या होत्या. त्यामुळे त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु झाल्या होत्या.

भुषण सोनवणे हा कानळदा रस्त्यावर त्याच्या आई, भाऊ आणि आजीसह रहात होता. बांधकामावर स्लॅब टाकण्याकामी कॉंक्रीट तयार करणारी मिक्सर मशीन त्यांच्याकडे होती. त्या मशीनवर सोनवणे परिवाराचा उदरनिर्वाह चालत होता.

8 नोव्हेंबर रोजी रविवारचा सुटीचा दिवस होता. या दिवशी भुषण याने त्याच्या तिघा मित्रांकडे दारुची मागणी केली होती. त्याची मागणी अमान्य झाली म्हणजे तिघा मित्रांना त्याच्याकडून शिवीगाळ करण्याचा प्रकार ठरलेला असे. त्याच्या फाटक्या तोंडाला त्याचे तिघे मित्र वैतागले होते. त्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्याचा विचार अतुल, प्रतिक व दुर्गेश या तिघा मित्रांनी ठरवले होते.

सायंकाळी भुषण याने त्याच्या आईला म्हटले की मला हद्दपारीची नोटीस आली असून त्याकामी वकीलाकडे जायचे आहे. वकीलाची फी देण्याकामी त्याने त्याच्या आईकडून दोनशे रुपयांची मागणी केली. त्याच्या आईने तिच्याजवळ असलेले दिडशे रुपये त्याला दिले. खिशात दिडशे रुपये पडताच भुषण घरातून बाहेर पडला तो पुन्हा घरी न येण्यासाठीच.

काही वेळातच सायंकाळ झाली व अंधार वाढत गेला. दरम्यान तिघा मित्रांनी त्याचा काटा काढण्याचे नियोजन केले होते. त्यांनी त्याला दारु पिण्यासाठी रात्री आमंत्रण दिले. दारु पिण्याचे आमंत्रण मिळताच त्याची कळी खुलली.

इंद्रप्रस्थ नगर भागातील खडके चाळ रस्त्यालगत अंडाभुर्जी गाडीच्या शेजारी बसून चौघा मित्रांनी कमी खर्चात आपला मद्यपानाचा कार्यक्रम सुरु केला. रात्रीच्या अंधारात चौघांचा मद्यपानाचा कार्यक्रम हळूहळू रंगात आला होता. दरम्यान दारुची नशा भुषणच्या अंगात येण्यास वेळ लागला नाही. दारुच्या नशेत झिंगलेल्या भुषणने अतुल यास जोरजोरात शिवीगाळ सुरु केली. त्यामुळे चिडलेल्या अतुलने देखील भुषण यास शिवीगाळ सुरु केली. प्रतिउत्तर म्हणून भुषणने अतुल यास त्याच्या स्टाईलमधे आई बहिणीवरुन शिवीगाळ सुरु केली. आज भुषणचा गेम करायचा हे तिघे मित्र मनाशी ठरवून तयारीनिशीच आले होते.

वादाचे स्वरुप तिव्र होताच झिंगलेल्या भुषणने अतुलच्या कानशिलात लगावून दिली.  कानशिलात बसताच अतुलच्या नजरेसमोर रात्रीच्या वेळी काजवे चमकू लागले. आता भुषण विरुद्ध तिघे अशी रणभूमी तयार झाली होती. अतुलच्या कानशिलात बसताच प्रतिकने भुषणवर चाकूचे घाव करण्यास सुरु केले. आता भुषणला बघूनच घ्यायचे असे तिघांनी मनाशी पक्के ठरवले होते.

भुषणवर चाकूचे घाव प्रतिककडून होत असतांना चिडलेल्या अतुलने त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेत आपल्या हाती घेतला. आता अतुलने भुषणवर चाकूचे सपासप वार करण्यास सुरुवात केली. अतुलने चाकू घेतल्यामुळे प्रतिकने आता दगडाचे घाव भुषणवर करण्यास सुरुवात केली. काही वेळात दुर्गेशने अतुलच्या हातातून चाकू घेतला. आता दुर्गेशने भुषणवर चाकूचे घाव करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे तिघांनी आळीपाळीने भुषणवर चाकूचे घाव घातल्यामुळे भुषण याने दम तोडला.  

दरम्यान रात्रीचे दहा वाजून गेले तरी भुषण घरी परत का आला नाही? म्हणून त्याची आई चिंताग्रस्त झाली होती. त्यावेळी काही तरुणांनी तिला या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच भुषणची आई धावत घटनास्थळी दाखल झाली. त्यावेळी हल्लेखोर तिघे जण भुषणवर चाकूचे घाव घालत मारहाण करतच होते. आपल्या मुलाला होत असलेली मारहाण बघून तिने जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली. आता जास्त वेळ थांबणे चुकीचे ठरेल हे लक्षात घेत तिघांनी तेथून पलायन केले.भुषणने प्राण सोडले होते. त्याचा मृतदेह बघून त्याची आई तेथेच धाय मोकलून रडू लागली.  या कालावधीत बघ्यांची गर्दी जमली होती.

या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे व त्यांचे सहकारी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, संजय भांडारकर, तेजस मराठे, योगेश इंधाटे, प्रणेश ठाकूर, भास्कर ठाकरे, गजानन बडगुजर, रतन गिते, ओम पांचलिंग, नासीर शेख, किशोर निकुंभ व राजकुमार चव्हाण असे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले.

रस्त्यावर निपचीप पडलेल्या भुषण यास देवकर हॉस्पीटल येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले. त्यामुळे त्याची उत्तरीय तपासणी करण्याकामी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी मयत भुषणची आई तिरोना भरत सोनवणे हिने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला अतूल ज्ञानेश्वर काटकर, प्रतिक निंबाळकर, दुर्गेश आत्माराम सन्यासी या तिघा तरुणांविरुद्ध खूनाचा रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनास्थळावरुन पळून गेलेल्या तिघा हल्लेखोर तरुणांना ताब्यात घेण्याकामी पथके रवाना करण्यात आली. दरम्यान शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी तेजस मराठे व योगेश इंधाटे  यांना अतुल काटकर व प्रतिक निंबाळकर यांचे लोकेशन खब-याकडून समजले. माहीती समजताच तेजस मराठे व योगेश इंधाटे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सापळा रचून अतुल काटकर यास त्याच्या राहत्या घरातून व प्रतिक निंबाळकर यास बहिणाबाई उद्यान परिसरातून ताब्यात घेत अटक केली.  

स्थानिक गुन्हे शाखेचे विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर यांनी दुर्गेश सन्यासी याला  शाहू नगर परिसरातून अटक केली. तिघा हल्लेखोर संशयीतांना पो.नि. धनंजय येरुळे यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सुरुवातीला पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली.

अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या निर्देशाखाली पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे व त्यांचे सहकारी वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, गणेश पाटील, प्रणेश ठाकूर, भास्कर ठाकरे, गजानन बडगुजर, रतन गिते, ओम पंचलिंग, नासीर शेख, व राजकुमार चव्हाण यांनी तपासकामी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here