पिंपरी: देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष उलटली आहेत. तरी देखील समाजातील जाती धर्माच्या भिंती अजूनही कायम आहेत. याच जातीपातीच्या भिंतीमुळे समाज विभागला गेला आहे. समाजात फुट पडली आहे. आजही माणसाची खरी ओळख त्याच्या जातीपातीनुसार ठरते. मात्र त्याचा सर्वाधिक फटका जातपात न मानणा-या आजच्या पिढीला होत आहे. त्यातूनच ऑनर किलींगच्या घटना घडत आहेत. पिंपरी येथे अशाच एका घटनेत एका हलक्या जातीतल्या मुलाने उच्च जातीच्या मुलीशी प्रेम केले. मुलीच्या कुटूंबीयांनी त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली.
प्रेमातून अनेक वेळा तरुण तरुणी आंतर जातीय विवाह करत असल्याच्या घटना समोर येतात.परंतू या आंतरजातीय विवाहाला कुटूंबातील लोक साथ देतातच असे नाही. आंतरजातीय तरुणावर किंवा तरुणीवर प्रेम केल्यामुळे त्यांचे कुटुंबीय त्यांना जिवे मारण्यास देखील मागे पुढे बघत नाहीत. पिंपरी-चिंचवड येथे अशाच प्रकारची एक घटना या महिन्यात घडली.
विराज जगताप असे या घटनेतील मयत तरुणाचे नाव असून तो आपल्या मुलीवर प्रेम करतो या रागातून एकाच कुटूंबातील सहा जणांनी मिळून या तरुणाला जीवे ठार केले. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसर हादरून गेला. पिंपळे-गुरव या परिसरात विराज जगताप हा आपल्या आई सोबत रहात होता. विराज लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्या आईवर येवून पडली होती. पतीच्या निधनामुळे खचून न जाता विराजच्या आईने त्याचा सांभाळ केला आणि त्याला शिक्षण देऊन मोठे केले. अशातच विराजचे परिसरातील एका मुलीवर प्रेम जडले. तरुण वयात अनेक मुला-मुलींचे एकमेकांवर प्रेम जडते. त्याचप्रमाणे विराजचे देखील एका मुलीबर प्रेम जडले. त्या मुलीचेही त्याच्यावर प्रेम होते. या प्रेम प्रकरणाची माहिती मुलीच्या घरी समजताच त्यांनी या प्रेम प्रकरणाला जोरदार विरोध केला. याचे कारण म्हणजे विराज खालच्या जातीचा होता व ते उच्च जातीचे होते. त्यामुळे मुलीच्या घरच्या लोकांनी विराजला दम देण्यास सुरुवात केली. पुन्हा आमच्या मुलीसोबत एकत्र दिसला तर जिवंत सोडणार नाही असा दम देत त्याला सोडून देण्यात आले.
परंतु एकमेकांवर खुपच जीव जडल्यामुळे दोघे प्रेमी लपून छ्पून एकमेकांना भेटतच होते. याची खबर मुलीच्या वडिलांना लागली. दरम्यान 7 जून रोजी विराज दुचाकीवरुन जात असल्याचे त्यांना दिसले. त्याच्यावर हल्ला करण्यासाठी मुलीच्या परिवारातील सर्वांनी टेम्पोत बसून त्याचा पाठलाग सुरु केला. मुलीचे कुटूंबीय आपला पाठलाग करत असल्याची जाणीव विराज यास झाली. त्यामुळे त्याने आपल्या ताब्यातील दुचाकी जोरात पळवण्यास सुरुवात केली. यावेळी सर्व हल्लेखोरांनी टेंपोतून पाठलाग करत विराज यास पिंपळे सौदागर येथील शिव बेकरीजवळ गाठले. त्याच्या दुचाकीला धडक देत त्याला खाली पाडले.
विराज खाली पडताच सर्व आरोपीतांनी हातातील लोखंडी रॉड व दगडाच्या सहाय्याने त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. सर्व हल्लेखोरांनी पलायन करण्यापुर्वी जितेश जगताप या परिचितास फोन करुन सांगितले की आम्ही विराज यास पिंपळे सौदागर येथे मारले असून तुम्ही त्याला तेथून घेवून जा. मिळालेल्या माहितीनुसार जितेश जगताप हे विराजच्या आईसह घटनास्थळी आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विराजने जितेश जगताप व त्याच्या आईला सर्व हकीकत कथन केली. या प्रकरणी जितेश वसंत जगताप यांनी फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी भा.द.वि. कलम ३०२,१४३, १४७.१४८,१४९ सह अनु.जाती जमाती कायदा कलम 3 (1) (आर), (एस) (२) ३(२) (व्ही) ६ मु.पो.अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.