जळगाव : जळगाव शहराच्या शाहु नगर परिसरातील उर्दू शाळेच्या चार खोल्यांची जागा चक्क लग्न समारंभ, साखरपुडा तसेच बैठकांसाठी वापरली जात आहे. एका विशीष्ट समुदायाने ती जागा बळकावली असून त्या जागेच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. एका सुज्ञ नागरिकाने माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांना पत्र देवून या जागेचा गैरवापर थांबवण्याकामी योग्य त्या सहकार्याची मागणी केली आहे. दिपककुमार गुप्ता यांनी त्यासंबंधी पाठपुरावा सुरु केला आहे.
शाहु नगर पोलिस चौकीसमोर बारा खोल्यांची एक चाळ आहे. या चाळीच्या बाजुला जळगाव महानगरपालिकेची चार खोल्या असलेली उर्दू शाळा आहे. मात्र या शाळेला ती चार खोल्या असलेली जागा अपुरी पडते. त्यामुळे या शाळेचे स्थलांतर वकील चेंबर्स शेजारी असलेल्या पडक्या शाळेनजीक करण्यात आले.
या जागेत सुरुवातीला जळगाव शहर महानगरपालिका संचलीत अशा नावाने विविध संस्था ( सार्वजनीक वाचनालय, बालवाडी, शिवण क्लासेस) सुरु करण्यात आल्या. काही दिवस देखावा झाल्यानंतर या जागेवरील विविध संस्थांच्या नावाचे बोर्ड हळूच गायब झाले वा गायब करण्यात आले.
सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या या जागेवर लग्न समारंभ, साखरपुडा तसेच काही बैठका सुरु झाल्या आहेत. या कामासाठी या जागा भाड्याने दिल्या जात असल्याची ओरड सुरु झाली आहे. भाड्याच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरु झाला आहे. या शाळेचे स्थलांतर होताच संधी साधून राजाश्रय मिळवून या जागेवर कब्जा करण्याचे काम एका समुदायाने केले आहे.
ज्या उद्देशाने या जागेत संस्था सुरु करण्यात आल्या होत्या त्या उद्देशालाच हरताळ फासण्यात आल्याचे बोलले जात आहे. तसेच शिवण क्लासेसच्या नावाने आणलेल्या शिलाई मशीन धुळखात पडुन आहेत. या जागेचा लग्न समारंभासाठी होत असलेल्या वापरामुळे साहजीकच रस्त्यावरील मंडपामुळे वाहतूक अडवली जाते. या ठिकाणी होणा-या जेवणावळीनंतर राहिलेले अन्न पदार्थ, डीश, ग्लासेस तेथेच पडून राहतात. त्यामुळे साहजीकच रोगराईला आमंत्रण मिळते. या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता तथा सामाजीक कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी पाठपुरावा सुरु केला आहे.