लुटमारीच्या टोळीतील आरोपी नाशिक एलसीबीने केला जेरबंद

नाशिक : नाशिक शहरातील व्यापा-याची काही दिवसांपुर्वी टोळीकडून लुटमार करण्यात आली होती. या लुटीत रोख रक्कम, दागीने तसेच इनोव्हा कार अशा मुद्देमालाची लुट करण्यात आली होती. या लुटमारीतील एक गुन्हेगार नाशीक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केला आहे.

नाशिक शहरातील व्यापारी उमेश चंद्रकांत गाडे हे 16 नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास दहावा मैल परिसरातील ढाब्यावर जेवण करुन नाशिक शहराच्या दिशेने त्यांच्या ताब्यातील कारने जात होते. त्यावेळी अज्ञात चार इसम त्यांच्या कारजवळ आले. आम्हाला नाशीक पर्यंत सोडता का? असे म्हणत ते त्यांच्या कारमधे बसले. कारमधे बसल्यानंतर चौघा गुन्हेगार व्यक्तींनी त्यांच्या डोक्याला पिस्टल व धारदार चॉपर लावला. त्यांचे डोळे बांधून त्याच्या खिशातील रोख रक्कम, हातातील चांदीचे कडे, चांदीची अंगठी व घडयाळ यासह त्यांच्या ताब्यातील इनोव्हा कार (एमएच १५ बीडी ८३२१) असा एकुण ०५ लाख ०५ हजार ४०० रूपयाच्या मुद्देमालाची लुटमार करण्यात आली होती.

या लुटमार प्रकरणी दिंडोरी पोलिस स्टेशनला गु.र.न. २८४/२०२० भा.द.वि. ३९४, ३४ यासह आर्म अॅक्ट ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शखेचे पो.नि. के.के. पाटील आपल्या पथकाच्या मदतीने या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.

तपासादरम्यान या गुन्हयातील अज्ञात आरोपी लुटीतील इनोव्हा कारसह नाशिक शहराच्या दिशेने गेल्याचे पथकाच्या लक्षात आले. महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमे-यात तसे आढळून आले होते. गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगार मुंबईकडे गेल्याचे पथकाला समजले होते.

तपास पथकाने मुंबईच्या अंधेरी, वसई-विरार परिसरात सलग दोन दिवस पाळत ठेवली. अखेर पथकाला या गुन्हयातील इनोव्हा कारचा शोध लागला. लुटीतील इनोव्हा कार वसई येथील एव्हरशाईन बिल्डींगच्या खाली उभी दिसल्याने तपास पथकाला आढळून आली. पथकाने सापळा रचुन गाडीतील इसमांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते सतर्क झालेल्या चालकाने भरधाव वेगाने कार पळवली. पोलिस पथकाने त्या कारचा पाठलाग सुरु केला.

गर्दीचा फायदा घेत आरोपींनी गाडीच्या खाली उतरुन झोपडपट्टी परिसरात पळून गेले. त्या जागेवरुन पथकाने ती कार ताब्यात घेतली. त्यानंतर पथकाने मुंबई पोलीसांच्या मदतीने जुहू पोलीस स्टेशन हद्दीतून सराईत गुन्हेगार अमन हिरालाल वर्मा, (३५) समतानगर, गुलमोहर क्रॉसरोड, अंधेरी वेस्ट, मुंबई यास ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने नाशिक जेलरोड, नाशिकरोड परिसरातील त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने केलेल्या या लुटमारीची कबुली दिली. पोलिस पथकाने ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यात एक देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, चॉपर, धारदार कोयते, स्कु ड्रायव्हर असा एवज मिळून आला. तो एवज जप्त करण्यात आला.

ताब्यातील आरोपी अमन वर्मा याच्या नाशिकरोड परिसरातील साथीदारांनी नाशिक शहराच्या उपनगर परिसरात दिवाळीच्या दुस-या दिवशी एका इसमाचा धारदार शस्त्राने खुन केल्याचे या तपासात निष्पन्न झाले आहे.

अटकेतील आरोपी अमन वर्मा याचेविरुध्द मुंबई शहरातील विविध पोलीस स्टेशनला घरफोडी, चोरी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील तसेच अप्पर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या लुटमारीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. के.के.पाटील व त्यांचे सहकारी पो.उ.नि. मुकेश गुजर, सहायक फौजदार रविंद्र शिलावट, हे.कॉ. दिपक अहिरे, पोलिस नाईक संदिप हांडगे, अमोल घुगे, हेमंत गिलबिले, पो.कॉ. सचिन पिंगळे, प्रदिप बहिरम आदींनी उघडकीस आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here