औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोयगाव (औरंगाबाद) डेपोत आज रविवारी तुफान हाणामारीचा प्रकार घडला. एस.टी.महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांनी मिळून आगार प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकाला लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली.रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी पाच एस.टी. कर्मचाऱ्यांविरोधात सोयगाव पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या बेदम मारहाणीत सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण (37) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले आहे. सोयगाव एस.टी. महामंडळ डेपोच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक राणीदास चव्हाण हे कर्तव्यावर होते. त्यावेळी वाहक प्रभू चोपडे, परमेश्वर शिंगाडे, विजय श्रीरामे व चालक रघुनाथ बारी, राजेंद्र भोपे असे पाच जण सकाळी सात वाजेला डेपोत आले. यावेळी स्थानकप्रमुख कैलास बागुल यांच्या आदेशानुसार सुरक्षारक्षकाने या पाचही जणांना अडवले.
आपल्याला सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण यांनी प्रवेशद्वारावर रोखल्याचा पाचही जणांना मोठा राग आला. त्यांनी रागाच्या भरात सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला चढवला. पाचही जणांनी सुरक्षा रक्षक राणीदास चव्हाण यांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत सुरक्षारक्षक चव्हाण गंभीर स्वरुपात जखमी झाले.
त्यांना तात्काळ जळगाव येथील एका रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचार सुरु आहेत. जखमी सुरक्षारक्षकाच्या फिर्यादीनुसार तीघे वाहक आणि दोघे चालक अश पाच जणांविरुद्ध सोयगाव पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे सोयगाव डेपोत वातावरण तणावात आले होते.
प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गीते, जमादार संतोष पाईकराव, सुभाष पाटील, रवींद्र तायडे, सागर गायकवाड पुढील तपास करत आहेत.