व्यसनाधीनांच्या जीवनात आणावा आशेचा किरण – माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील

जळगांव :- कोणतेही व्यसन जीवाला घातक असते. व्यसनाधीन व्यक्तीची अवस्था बिकट झाल्याने तो सर्वस्व हरपून बसलेला असतो. व्यसनाच्या गर्तेत गेलेल्यांना सुजाण नागरिकांनी पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे आहे. त्यांच्या आयुष्यात आशेचा ‘ किरण ‘ कसा दिसेल, याकामी प्रयत्नशील राहून जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन चिंचपुरेचे मूळ रहिवासी तसेच कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉ. के.बी. ( अण्णा ) पाटील यांनी केले आहे.

पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे येथे चिंचपुरे विकास मंच आयोजित व्यसनमुक्ती शिबिराचा उदघाटन कार्यक्रम झाला. याप्रसंगी डॉ. पाटील आपले मनोगत व्यक्त करत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून कार्पोरेट ट्रेनर तथा प्रसिध्द समुपदेशक रागिब अहेमद, जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा कलावंत आणि जेष्ठ पत्रकार तुषार वाघुळदे हजर होते.

याशिवाय पंचायत समितीचे माजी सदस्य भास्कर संतोष पाटील, व्यसनमुक्तीची चळवळ चालवणारे माजी सुभेदार तसेच विद्यापीठात कार्यरत असलेले समाधान हरी पाटील, पोलीस पाटील भास्कर संतोष पाटील, माजी सरपंच भागवत पाटील, भगवान माधवराव पाटील, आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त जि.प. प्राथमिक शाळा चिंचपुराचे मुख्याध्यापक सुभाष देसले, जेष्ठ नागरिक उत्तम बाबुराव पाटील, माजी सैनिक रमेश कडू पाटील, सुभाष पांडुरंग पाटील, नाना सुपडू पाटील, नाना साहेबराव पाटील, विनोद पुंडलिक पाटील यांची उपस्थिती होती.

समुपदेशक रागिब अहेमद यांनी यावेळी बोलतांना म्हटले की “व्यसनामुळे मानसिक आणि शारीरिक आजार बळावतात. व्यसनामुळे भ्रम हा गंभीर आजार देखील होत असतो. कोणत्या ना कोणत्या कारणाने व्यसन सुटत नाही. ज्याला व्यसनांपासून पूर्णपणे मुक्त व्हायचे आहे, त्याने आधी मनाच्या तयारीसोबत सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे.

शासनाकडून अंमली पदार्थ विक्रेत्यांवर योग्य ती कठोर कारवाई होताना दिसून येत नाही. व्यसनाच्या नादी लागून अनेक गुन्हे घडत असल्याचे दिसत आहे. आत्महत्येचे वाढत असलेले प्रमाण चिंताजनक आहे. कुटुंब उध्वस्त होत असून ही चळवळ अधिक प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.

“जगात ही चळवळ सामाजिक संस्था राबवत असून त्याचा वेग मंदावला असल्याची खंत तुषार वाघुळदे यांनी बोलतांना व्यक्त केली. पुढे बोलतांना वाघुळदे यांनी म्हटले की “बदलत्या जीवनशैलीसह कामाच्या व्यापामुळे पालकांना आपल्या मुलांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. पालक आणि मुलांमधील संवाद खूप कमी झाला आहे. अनेक शाळांमध्ये व्यसनी मुलांची ‘गँग’ तयार झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा प्रकार धक्कादायक आहे. गुटखा, दारु, गांजा, तंबाखू, फेवीबॉड यामुळे ऐन तारुण्यात पदार्पन करणा-या मुलांचे आयुष्य उध्वस्त होत असल्याचे दिसून येत आहे. समाजाने जनजागृतीचा विडा उचलण्याचि तसेच व्यसनापासून तरुणाईला परावृत्त करण्याची गरज आहे.

रागिब अहेमद यांनी याप्रसंगी काही रुग्णांचे व्यक्तीगत समुपदेशन केले. त्यांनी विविध शंका – कुशंकाचे निरसन देखील केले. शिबिरात व्यसन सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध औषधी व्यसनींना देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षिका रेखा पाटील यांनी स्वागतगीताचे सादरीकरण केले. पाहुण्यांनी दीपप्रज्वलन करुन शिबिराचे उदघाटन केले. सुत्रसंचालन मुख्याध्यापक देसले यांनी केले. कार्यक्रमास चिंचपुरे येथील ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here