जळगाव : गेल्या 29 नोव्हेंबर रोजी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या होत्या. या चोरीच्या दुचाकी चोरट्यांनी पाचोरा तालुक्यातील दोघा जणांना कमी किमतीत विकल्या मात्र कागदपत्रे दिली नाही. कागदपत्रे लवकरच आणून देतो असे म्हणत चोरट्यांनी त्या दुचाकी कमी किमतीत दोघांना विक्री केल्या. खरेदीदारांनी देखील कमी किमतीत दुचाकी मिळत असल्याच्या आमिषाला बळी पडून दुचाकी विकत घेतल्या. पैसे हाती पडताच चोरट्यांनी फरार होण्याचे काम केले.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, पो.हे.कॉ.शरीफोद्दीन काझी, युनुस शेख, किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव यांचे पथक दुचाकी चोरांच्या मागावर होते. चोरीच्या दुचाकी पाचोरा तालुक्यात कमी किमतीत विक्री होत असल्याची माहिती पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्यानुसार तपास सुरु होता.
तपासादरम्यान चोरीच्या दोन दुचाकी सावखेडा ता. पाचोरा येथील रहिवासी कल्पेश रविंद्र पाटील याच्या ताब्यात तपास पथकाला मिळून आल्या. चोरीची एक दुचाकी सावखेडा येथीलच शिवाजी करतारसिंग परदेशी यांच्या ताब्यात मिळून आली. एक दुचाकी वरखेडी बस स्थानकावर मिळून आली.
कमी किमतीत दुचाकी विकत मिळत असल्याच्या आमिषला बळी पडून कल्पेश रविंद्र पाटील व शिवाजी करतारसिंग परदेशी यांनी त्या दुचाकी विकत घेतल्या होत्या.
या चारही दुचाकी चोरी झाल्याबाबत खुलताबाद व सिल्लोड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल होते. या चारही दुचाकी एलसीबी पथकाने हस्तगत करत औरंगबाद जिल्हयातील खुलताबाद व सिल्लोड पोलिसांच्या सुपुर्द केल्या आहेत.
या प्रकरणातील कल्पेश रविंद्र पाटील व शिवाजी करतारसिंग परदेशी या दुचाकी खरेदीदारांचे पैसे गेले व दुचाकी देखील ताब्यातून गेल्या. त्यामुळे त्यांना मनस्ताप झाला. मात्र कमी किमतीत दुचाकी मिळत असल्याचे बघून ते या मोहाला बळी पडले व मनस्तापाचे धनी झाले. जुन्या दुचाकी विकत घेतांना पुर्ण खात्री केल्याशिवाय तसेच कागदपत्रांची खातरजमा करणे महत्वाचे ठरते. शिवाजी परदेशी व रविंद्र पाटील यांचा गुन्ह्याशी थेट संबंध नसून ते केवळ दुचाकी खरेदीदार होते. यापुर्वीच्या वृत्तात तसे नजरचुकीने प्रसिद्ध झाले आहे याची नोंद घ्यावी.
यापुर्वीच्या वृत्तात नजरचुकीने तसा उल्लेख आल्यामुळे परदेशी व पाटील परिवारास मनस्ताप झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली जात आहे. याबाबत शिवाजी परदेशी यांच्या भगिणी यांनी त्याबाबत पाठपुरावा करुन तसे पटवून दिले आहे. केवळ ती दुचाकी विकत घेतल्याच्या चुकीमुळे शिवाजी परदेशी व पाटील या परिवाराला मनस्तापाची झळ बसली आहे व त्यातून धडा मिळाल्याची भावना शिवाजी परदेशी यांच्या भगिणी यांनी व्यक्त केली आहे.