जळगाव : बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाई स्मृती संग्रहालयात बहिणाबाई चौधरी यांचा 69 वा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमा पूजन करत त्यांना अभिवादन करण्यात आले.
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी यांच्याहस्ते बहिणाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बहिणाबाई चौधरी यांच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणती प्रियंका चौधरी, शोभाबाई चौधरी, प्रिया चौधरी, वैशाली चौधरी, हितेंद्र चौधरी, मनस्वी चौधरी, राजेंद्र हरिमकर आदी हजर होते.
बहिणाईंच्या परिवारातील सदस्यांसह चौधरी वाड्यातील सदस्यांच्या उपस्थितीत लोकशाही टिव्हीवर ऑनलाईन प्रसारीत करण्यात आलेला ‘अरे संसार संसार’ हा कार्यक्रम पाहिला गेला. परिवर्तन जळगावच्या महाराष्ट्राभर गाजणा-या बहिणाईंच्या गितांसह कवितांची सुरेल मैफील, ‘अरे संसार संसार’च्या माध्यमातून चौधरी वाड्यातील सदस्यांनी अनुभव घेतला. कार्यक्रमाच्या वेळी कोरोनाच्या बाबतीत असलेले सर्व नियम पाळण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक चौधरी, रंजना चौधरी यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी दिवसभर स्मृतीसंग्रहालयाला साहित्यप्रेमींनी भेटीदेखील दिल्या.
जैन इरिगेशन सिस्टीम्सचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे जळगावच्या चौधरी वाड्यातील बहिणाबाईंच्या घराचे रुपांतर संग्रहालयात करण्यात आले आहे. बहिणाबाई चौधरी यांच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारे, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पुजेचे साहित्य आदी वस्तूंची जपणूक करण्यात आली आहे. हा अनमोल ठेवा पुढील प्रत्येक पिढीला बघता येत आहे. ‘अरे संसार संसार’ म्हणत संसारातील सुख दुःखांच्या साक्षीदार असणा-या विविध गोष्टी या संग्रहालयात बघण्यास मिळत आहे.