बहिणीचे लग्न प्रियकर हरिकेशमुळे मोडले;भावासह चौघांनी त्याला यमसदनी धाडले

harikesh sonavane mayat

जळगाव: हरिकेश सोनवणे आणि भरत वाघ हे दोघे मित्र चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे या गावी रहात होते. भरत वाघ याच्याकडे शेतीची मशागत करण्यासाठी लागणारे ट्रॅक्टर होते. त्या ट्रॅक्टरवर भरतने त्याचा मित्र हरिकेश यास कामावर ठेवले होते. दिसायला झकपक आणि रंगाने गोरा असलेल्या ट्रॅक्टर चालक हरिकेशचे जवळच असलेल्या गावातील एका तरुणीवर प्रेम जडले होते. त्या तरुणीसोबत हरिकेशच्या प्रेमाच्या तारा जुळल्या होत्या. ती तरुणी आणि हरिकेश एकमेकांना लपूनछपून भेटत होते. पुर्वीच्या काळात प्रेमाचा संदेश देण्यासाठी कबुतरांचा वापर केला जात होता. आता तशी गरज राहिलेली नाही. आता मोबाईल एक ना अनेक कामे करतो. त्यामुळे या जमान्यातील मोबाईलच्या मदतीने दोघे एकमेकांच्या ऑनलाईन संपर्कात रहात होते. कधी कधी ते ऑफलाईन संपर्कात देखील रहात होते. दोघांच्या प्रेमाचा सिलसिला काही वर्षापासून सुरु होता.

मेहुणबारे या गावातील ट्रॅक्टर चालक हरिकेश सोनवणे या तरुणासोबत आपल्या मुलीचे प्रेमसंबंध सुरु असल्याची कुणकुण त्या तरुणीच्या आईवडीलांना लागण्यास वेळ लागला नाही. आपली मुलगी मेहुणबारे येथील हरिकेशच्या नादी लागल्याची त्यांनी खात्री करुन घेतली. तिच्या व हरिकेशच्या प्रेमाला त्यांचा प्रखर विरोध होता. आपली मुलगी हरिकेशच्या प्रेमात जास्त वाहवत जाण्याअगोदर तिचे लग्न समाजातील तरुणासोबत लावून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी तिला तशी समज दिली. मात्र तिचे हरिकेशसोबत प्रेम संबंध सुरुच होते. दोघांनी सोबत लग्न करण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. समज देवूनही आपल्या मुलीचे हरिकेश सोबत असलेले प्रेम संबंध काही केल्या संपुष्टात येण्याची चिन्हे त्यांना दिसत नव्हती. त्यामुळे तिच्या आईवडीलांनी तिच्यासाठी योग्य स्थळ शोधून लवकरात लवकर तिचे लग्न उरकण्याच्या कामाला गती दिली. आपल्या लग्नासाठी आपल्या आईवडीलांची सुरु असलेली लगबग तिच्यासाठी हैरान करणारी गोष्ट होती. तिने हा प्रकार तिचा प्रियकर हरिकेशच्या कानावर घातला होता.

sachin bendre API

लवकरच त्या तरुणीच्या आईवडीलांनी तिचे लग्न नाशिक जिल्हयातील एका तरुणासोबत निश्चित केला. लग्न निश्चित झाल्यामुळे ती तरुणी आता हतबल झाली. तिने हा प्रकार देखील तिचा प्रियकर हरिकेशच्या कानावर घातला. आपले लग्न निश्चित झालेल्या नियोजित वराचे नाव आणि पत्ता तिने हरिकेश यास सांगितले. हे लग्न तिला व हरिकेशला मान्य नव्हते. त्यामुळे प्रेयसीने दिलेल्या नाशिक जिल्हयातील पत्त्यावर जावून हरिकेशने त्या उपवराचे घर गाठले. त्या उपवर तरुणाला भेटून आपले व त्याच्या होणा-या भावी वधूचे प्रेम संबंध असल्याचे हरिकेशने सांगितले. लग्न होण्याआधीच आपल्या भावी पत्नीचे प्रेम संबंध उघड झाल्यामुळे त्याने हा प्रकार आपल्या आईवडीलांकडे कथन केला. त्यांनी तात्काळ निर्णय घेत ठरलेले लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. तसा निरोप देखील त्यांनी हरिकेशच्या प्रेयसीच्या घरी पाठवला. लग्न जुळल्याचा दोन्ही परिवारातील आनंद क्षणीक ठरला. त्यांच्या आनंदावर विरजण पडले. इकडे तरुणीच्या घरातील उत्साही वातावरण गंभीर झाले होते. यापुढे हरिकेश सोबत बोलतांना दिसली तर याद राख असा दम तिच्या भावांसह आईवडीलांनी तिला दिला. त्यामुळे तिने हरिकेशसोबत भेटणे व बोलणे बंद केले.

आपल्या बहिणीचे लग्न मोडण्यामागे हरिकेशची करतूत असल्याची माहिती त्या तरुणीच्या आईवडील व भावांना समजण्यास वेळ लागला नाही. आपल्या बहिणीचे लग्न केवळ हरिकेशमुळे मोडल्याचा राग तिच्या भावांना आला. संतापी स्वभाव असलेल्या तिच्या भावांनी हरिकेश यास बघून घेण्याचे ठरवले.

जवळच असलेले मेहुणबारे गाव गाठून त्यांनी हरिकेशची भेट घेतली. तुझ्यामुळे आमच्या बहिणीचे ठरलेले लग्न मोडले आहे. आता तुझा नायनाट होणार अशी गर्भित धमकी त्यांनी हरिकेश यास दिली. मिळालेल्या धमकीमुळे हरिकेश आता तणावात राहू लागला. त्याचे व त्याच्या प्रेयसीचे बोलणे व भेटणे देखील बंद झाले होते. त्यामुळे तो अस्वस्थ आणि तणावात राहू लागला. त्याच्या चेह-यावरील नुर बिघडला होता. प्रेयसीसोबत भेटणे व बोलणे बंद तशातच तिच्या भावांकडून बघून घेण्याची मिळालेली धमकी अशा वातावरणात त्याचे कामात लक्ष लागत नव्हते. तो उदास राहू लागला.

त्याच्या उदासीचे कारण त्याचा मित्र भरत वाघ याने त्याला विचारले.  त्यावर हरिकेशने त्याला सांगितले की माझ्या प्रेयसीचे लग्न तिच्या समाजातील एका तरुणासोबत जुळले होते. मी तिच्या भावी पतीच्या घरी जावून त्याला आमच्या प्रेमाची कल्पना दिली. त्यामुळे तिचे जुळलेले लग्न मोडले आहे. या प्रकारामुळे तिच्या भावांनी मला बघून घेण्याचा दम दिला आहे. आपल्या जिवीताला धोका असल्याची कल्पना हरिकेश याने भरत यास दिली. त्यावर भरतने हरिकेश यास समजावले की तू जास्त विचार करु नको. तु आपल्या कामावर लक्ष दे. कशीबशी समजूत काढल्यावर उदास हरिकेशने आपल्या कामावर लक्ष देण्यास सुरुवात केली.

hemant-shinde-PSI

23 मार्च रोजी हरिकेशच्या ताब्यातील भरतचे ट्रॅक्टर पंक्चर झाले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भरत व हरिकेश असे दोघे जण गावातील पंक्चर काढण्याच्या दुकानावर गेले. पंक्चरचे दुकान बंद होते. त्यामुळे दुकानदार येण्याची दोघे जण वाट बघत होते. तेवढ्यात त्या तरुणीचे दोघे भाऊ दोघा साथीदारांसह त्याठिकाणी दुचाकीने आले. आल्याबरोबर चौघांपैकी तिघांनी मिळून हरिकेश यास पकडून ठेवले. तरुणीच्या भावाने हरिकेश यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तुझ्यामुळे आमच्या बहिणीचे लग्न मोडले आहे, आता तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणत एकाने हातातील धारदार हत्याराने हरिकेशच्या पोटात सपासप वार करण्यास सुरुवात केली.

धारदार हत्याराचे हरिकेशच्या पोटात दोन ते तीन वार झाल्यामुळे हरिकेश जमीनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हरिकेशला वाचवण्यासाठी सोबत असलेला भरत सरसावला. तेवढ्यात त्या कथीत प्रेयसी असलेल्या तरुणीच्या भावाने जखमी हरिकेश यास त्याच्या ताब्यातील दुचाकीवर बळजबरी बसवले. आलेल्या चौघांनी जखमी हरिकेश यास ताब्यात घेत दुचाकीवर बसवून आपल्या गावाच्या दिशेने कुच केले. लॉकडाऊन सुरु असल्यामुळे रस्त्यावर तसेच गावात गर्दी नव्हती. जखमी हरिकेश यास वाटेत फेकून देण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण करत असल्याचे भरत यास समजले. त्याने सर्वांचा आपल्या दुचाकीने पाठलाग सुरु केला. रस्त्यात एका ठिकाणी भरत सर्वांच्या पुढे गेला व त्यांच्या मोटारसायकलच्या पुढे आडवा झाला. भरतने वाट अडवल्यामुळे चौघांना थांबणे भाग पडले.  त्यावेळी तरुणीचा भाऊ भरत यास म्हणाला की तू आमच्या मधे पडू नको. नाहीतर तुला देखील आम्ही जिवंत ठेवणार नाही. त्यावेळी एकाच्या हातात फायटर होते. आपला जिव वाचवण्यासाठी भरतने रस्त्यावर पडलेला एक दगड उचलला. हातात दगड उचलून भरतने जोरजोरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे घाबरुन सर्वांनी हरिकेश यास तेथेच जखमी अवस्थेत सोडून आपल्या गावाच्या दिशेने पलायन केले. हरिकेशचा जिव वाचवण्यासाठी  भरतने त्याला आपल्या दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात आरडाओरड एकून त्याठिकाणी भरतचे दोघे मित्र आले. त्यांच्या मदतीने जखमी हरिकेश यास मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र जखम खोल असल्यामुळे तेथे उपचार होणे शक्य नव्हते. तेथील आरोग्य सेवकांनी त्याच्यावर प्राथमीक उपचार करत त्याला तात्काळ धुळे शासकीय रुग्णालयात घेवून जाण्यास सांगितले. वाटेत जखमी हरिकेशच्या वेदना तिव्र झाल्या होत्या. धुळे जाण्यासाठी लागणारे अंतर जास्त होते. त्या तुलनेत चाळीसगावचे अंतर कमी होते. हा विचार करत भरतने धुळे येथे जाण्याचा विचार बदलला. हरिकेशला धुळे येथे सरकारी दवाखान्यात नेण्याएवजी चाळीसगावच्या खासगी दवाखान्यात नेण्याचा विचार भरतने केला. चाळीसगाव येथे गेल्यावर एकाही खासगी दवाखान्यात त्याला उपचारासाठी घेण्यात आले नाही. त्यामुळे नाईलाजाने भरतने त्याला पुन्हा धुळे येथे एका खासगी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला बाहेरच्या बाहेरच तपासून मृत घोषित केले. त्यामुळे त्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्याला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिस स्टेशनला समजली होती. माहिती मिळताच मेहुणबारे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक सचिन बेंद्रे यांनी आपल्या सहकारी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली होती.

मदतीचा सर्व खटाटोप केल्यानंतर भरत मेहुणबारे पोलिसात फिर्याद देण्यासाठी आला. त्याच्या फिर्यादीनुसार संबधीत तरुणीच्या भावासह त्याचे मित्र अशा चौघांविरुद्ध अपहरणासह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा गु.र.न. 162/20 भा.द.वि. 302, 34 नुसार दाखल करण्यात आला. या गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक  हेमंत शिंदे व कर्मचा-यांनी सुरु केला. दरम्यान मयत हरिकेशच्या संतप्त नातेवाईकांनी उग्र रुप धारण केले होते. जोपर्यंत चौघा हल्लेखोरांना अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला. त्यांनी पोलिस ठाण्यावर दगडफेक सुरु केली. या घटनेचे तिव्र पडसाद उमटू लागले. गावात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. संतप्त नातेवाईकांची समजूत घालण्यात आली. त्यानंतर वातावरण निवळले. चौघा हल्लेखोरांना अटक करण्यात आल्याची माहीती संतप्त नातेवाईकांना देण्यात आली तेव्हा जमाव शांत झाला.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक सचिन बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक हेमंत शिंदे व त्यांचे सहकारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here