बसखाली ठार झालेल्या इसमाची पटली ओळख

जळगाव : गेल्या 1 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल प्रेसिडेंट नजीक बसच्या चाकाखाली आलेल्या इसमाची ओळख पटली आहे. बसच्या चाकाखाली आलेल्या व ठार झालेल्या इसमाची एमआयडीसी पोलिस स्टेशनला मिसींग दाखल झालेली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली ते रेमंड चौफुली दरम्यान हॉटेल प्रेसिडेंट नजीक जळगाव – श्रीगोंदा (MH-11 BL 9385) ही बस भरधाव वेगाने औरंगाबादच्या दिशेने जात होती. त्या बसच्या चालकाच्या बाजुकडील चाकाखाली एक इसम चिरडला गेला होता. त्यावेळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक इमरान सैय्यद व गोविंदा पाटील असे दोघे कर्मचारी गस्तीवर होते. त्यांनी बसच्या चाकाखाली आलेल्या अनोळखी इसमास तात्काळ वैद्यकीय उपचारार्थ देवकर रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यास मयत घोषीत केले होते. या घटनेप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला बस चालकाविरुद्ध भा.द.वि. कलम 279, 304(अ), मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घटनेतील मयत इसमाचे नाव तपासाअंती सुधाकर साहेबराव खैरनार असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर अपघाताची घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली होती. मात्र या घटनेतील मयत सुधाकर खैरनार याच्या भावाने तो 12 नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेल्याबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला माहिती दिली होती. मयत सुधाकर खैरनार हा एकटाच सुप्रिम कॉलनीत रहात होता. मयताच्या भावाने अपुर्ण माहिती दिल्यामुळे तपास लागण्यास उशीर झाला. मात्र पो.हे.कॉ. संजय धनगर यांनी सखोल तपास केला व त्यात त्यांनी मयताची ओळख पटवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here